औरंगाबाद – शिवसेनेत मी आग लावण्याचे काम करत नाही. एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते आहेत, मनातील इच्छा ते बोलले नाही. पण एकनाथ शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात, याचा मला विश्वास आहे, असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद येथे पत्रकारांशी ते बोलत होते. रावसाहेब दानवे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी होण्यास वेळ लागत असेल तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व का सोपवत नाहीत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही काळ आजारातून बरे होत नसल्याने एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला पाहिजे. ते हे पद सांभाळण्यास सक्षम आहेत.
मी शिवसेनेत आग लावण्याचे काम करत नसून उद्धव ठाकरे नंतर शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हेच नेते आहे. एक सक्षम नेतृत्व म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहतो, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यांना बरं व्हायला आणखी काही दिवस लागतील. मुख्यमंत्री आजारातून लवकर बरे व्हावेत, अशी माझी आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांनी या राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध व्हावे, असे आमचे मत आहे. पण मुख्यमंत्री आजारी असताना हे राज्य कसं चालेल? एकनाथ शिंदे यांनाच नव्हे कुणालाही द्या. राष्ट्रवादीला द्या, अजित पवारांना द्या. संधी दिली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगाविला.