सातारा -कण्हेर (ता. सातारा) गावात मोठ्या प्रमाणात करोनाचा शिरकाव झाला असून प्रशासन साखळी तोडण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यात यश येताना दिसत नाही. गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार कण्हेर येथील एकाच कुटुंबातील आठ जण बाधित आढळले आहेत. गावातील करोनाबाधितांची संख्या 62 वर गेल्याने प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बाधित रुग्णांच्या सहवासात आलेल्या नागरिकांना आरोग्य विभागाच्यावतीने क्वारंटाइन करण्यात आले आहे.
सातारा तालुक्यात जिहे, चोरगेवाडीनंतर कण्हेर गाव करोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. या गावातील भाजीविक्रेता प्रथम बाधित आढळला होता. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होत गेली. महिला बचत गटाच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या तीन महिला बाधित आढळून आल्या होत्या.
या महिलांच्या सहवासात आलेले बाधित आढळून आल्याने गावची संख्या 55 पर्यंत गेली. यादरम्यान गावातील 77 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण होते. दि.8 जुलै रोजी गावात पहिला करोना बाधित सापडल्याने गेले 23 दिवस गाव कंटेनमेंट झोनमध्ये आहे. गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये कण्हेर गावातील एकाच कुटुंबातील तब्बल आठ जण बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
एकाच कुटुंबातील 21, 29, 27 वर्षीय महिला, तसेच 35, 4, 7, 40, 41 वर्षीय पुरुष बाधित आढळले आहेत. ग्रामस्थांना इतरत्र जाण्यासाठी मज्जाव केला जात आहे. प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य, पोलिस, महसूल विभागाच्यावतीने गावात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी कण्हेर गावास भेट देऊन उपाययोजनांची पाहणी केली.