आठ उमेदवारांना पाठवली नोटीस

उमेदवारांकडून घेतले जाताहेत आक्षेप

पिंपरी – प्रमुख राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वच उमेदवार प्रचारादरम्यान जपून पाऊले टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. आचारसंहिता भंग किंवा निवडणूक खर्चात आपल्याकडून काही चूक होऊ नये, म्हणून उमेदवारांकडून काळजी घेण्यात येत आहे. याची प्रचिती दि. 15 एप्रिल रोजी उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या खर्चाच्या तपशीलामध्ये दिसून आली. सध्या उमेदवारांनी दाखल केलेल्या खर्चाची तपासणी करण्याचे काम आयोगाकडून सुरु आहे. पहिल्या टप्प्यात खर्च सादर न करणाऱ्या 8 उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवून जाब विचारला आहे व लवकरात लवकर आपला खर्च सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, हे उमेदवार आपला खर्च केव्हा सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी यावेळी अत्यंत चुरशीची लढत होत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात 24 उमेदवार उतरले आहेत. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगालाही मोठी कसरत करावी लागत आहे. विविध पथके तयार करुन निवडणूक आयोग उमेदवारांच्या खर्चावर तसेच त्यांच्या प्रचारावर लक्ष ठेऊन आले. सोमवार दि. 15 एप्रिल रोजी मावळ लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील आपला उमदेवारी खर्च निवडणूक आयोगाला सादर करायचा होता. मावळ लोकसभेसाठी तब्बल 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 8 उमेदवारांनी माघार घेतली असली तरी माघार घेतलेल्या उमेदवारांनीही आपला खर्च सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे, या उमेदवारांनाही आपला खर्च सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या 24 उमेदवांरापैकी 20 उमेदवारांनी आपला पहिल्या टप्प्यातील खर्चाची नोंदवही, रजिस्टर, निवडणूक आयोगापुढे सादर केले. हा खर्च निवडणूक आयोगाच्या नोंदी नुसार बरोबरच आहे की नाही? याची तपासणी करण्याचे काम सध्या निवडणूक आयोगाच्या वतीने सुरु आहे. तर उर्वरीत 4 उमेदवारांनी आपला खर्चाचा तपशील निवडणूक विभागाकडे सादर केलेला नाही. खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना निवडणूक विभागाने नोटीस काढली असून जाब विचारला आहे. तसेच लवकरात लवकर खर्च सादर न केल्यास कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माघार घेतलेल्या 8 उमेदवारापैकी 4 उमेदवारांनीही अर्ज मागे घेण्यापर्यंतचा खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे, त्यांनाही निवडणूक विभागाने नोटीस काढली आहे.

खर्च सादर करताना उमेदवारांना परिपूर्ण खर्च सादर करावा लागतो. प्रचारावर झालेल्या खर्चाबरोबरच कार्यकर्त्याना नाष्टा, जेवण, चहा वर किती रुपये खर्च केले याचे मोजमापही निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येते. निवडणूक विभागाने उमेदवारांच्या संमतीने दरपत्रक ठरवले जाते. या दरपत्रकाद्वारे या खर्चाचे मोजमाप करण्यात येते. मात्र, निवडणूक विभागाच्या निरीक्षणांमध्ये तसेच त्यांच्या कॅमेरात आलेले लोक व उमेदवाराने दाखवलेले लोक यामध्ये तफावत आढळल्यास उमदेवारांकडून आक्षेप घेतला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.