पुणे – करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमधील धोका विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत होणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, लहान मुलांवरील उपचाराबाबत प्रतिबंधात्मक औषधे उपलब्ध करून द्यावी. सध्या मृत्यूदर नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.
विधानभवन येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील करोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसची सद्यस्थिती, उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णदर कमी असल्याचे दिसून येत आहे, ही दिलासादायक बाब आहे. असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
प्रशासनाला सूचना
जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा तपासून घेऊन त्रुटींची पूर्तता करावी. ऑडिट न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा.
रुग्णांकडून आकारलेल्या बिलांची तपासणी करावी. वाढीव बिले, औषधांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा.
कोविड सेंटरमध्ये मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार पद्धतीचे पालन, वैद्यकीय सुविधांच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा.
करोनामुक्त नागरिकांना म्युकरमायकोसिस अथवा अन्य काही लक्षणे जाणवतात का, याची माहिती घ्या. गरजेनुसार वेळेत उपचार करा.
लसीकरणास प्राधान्य
करोना प्रतिबंधाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यावर भर देण्यात येत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पवार यांनी सांगितले.