पुणे – “सध्या रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा नाही. मात्र, त्याचा जास्त वापर नको, असा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे, तर म्युकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा मात्र तुटवडा आहे. त्यामुळे ही इंजेक्शन मिळवणासाठी संबंधित कंपन्यांना संपर्क केला. मात्र, तयार इंजेक्शन्सचा पुरवठा केंद्र सरकारला द्यावा लागणार आहे, असे कंपन्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोणत्या राज्याला किती इंजेक्शन्स पुरवायची याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे शहरात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या सुमारे 300 आहे. अन्य जिल्ह्यांतील रुग्णसुद्धा उपचार घेत आहेत. एका रुग्णाला दररोज सहा इंजेक्शन्सची आवश्यकता असते. त्यानुसार दररोज 1,800 इंजेक्शन्सची गरज आहे. मात्र, त्यानुसार पुरवठा होत नाही. रेमडेसिविर वितरणात आता सुसूत्रता आली. त्याचप्रमाणे म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचे वितरणही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
तिसरी लाट रोखण्याची तयारी
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर्स उभारण्याचे काम सुरू आहे. येरवडा येथे लहान मुलांसाठीचे 100 बेडचे कोविड सेंटर सुरू झाले आहे. करोनाची तिसरी लाट येऊच नये, यासाठी काळजी घेऊ. मात्र, तिसरी लाट आली तरी लढण्यासाठी राज्य सक्षम असल्याचे पवार यांनी सांगितले.