नीरा -पुणे जिल्हा परिषदेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. परदेशातून आलेल्या लोकांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी. परिसराची व वयक्तीक स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामपंचायतीने जनजागृतीसाठी सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावणे, घंटागाडीवरील स्पिकरमधून आवाहन करणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी सर्वेक्षणासाठी आले असता त्यांना खरी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नीरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी घाटगे यांनी केले.
नीरा (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीत करोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सहविचार सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
डॉ. घाटगे म्हणाल्या की, ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्येक प्रभागात एक सहविचार सभा आयोजित करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व स्थानिक डॉक्टरांनी लोकांना करोना विषाणू, रोगाची लक्षणे तसेच उपचारासाठी मार्गदर्शन करावे.
यावेळी सरपंच दिव्या पवार, उपसरपंच विजय शिंदे, डॉ. गणेश पवार, नीरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राम रणनवरे, डॉ. निरंजन शहा, डॉ. लिलाधर मंदकन्नली, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, बाळासाहेब भोसले, माजी सरपंच राजेश काकडे, आरोग्य सहायक गणेश जाधव, आरोग्य सेवक शिवाजी चव्हाण, व्यापारी असोसिएशनचे राजीव गांधी, जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक शिरीष प्रभुणे, नवनाथ गायकवाड, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख थिटे, आरोग्यसेविका, अशा वर्कर उपस्थित होते. अनिल चव्हाण यांनी स्वागत केले. माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले यांनी आभार मानले.