बारामतीत एकावर गुन्हा दाखल ः भीतीपोटी दोन आठवड्यांनंतर फिर्याद दाखल
बारामती -पन्नास लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी खंडणीसह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यान्वये बारामती शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. बबन बन्सी निंबाळकर (रा. चिमणशहामळा, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डॉ. निंबाळकर यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी प्रताप रमेश जाधव (बारामती) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. निंबाळकर यांच्याकडील कामगाराला जाधव यांनी जातीवाचक शिविगाळ केली. त्यामुळे पोलिसांनी खंडणी, धमकावण्यासह ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, जाधव यांना अटक करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. 3 मार्च व 4 मार्च रोजी दूध संघ वसाहतीमध्ये ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, निंबाळकर यांनी बारामतीतील दोघांशी जमिनीचा व्यवहार झाला होता; परंतु त्यात काही अडचणी आल्या. या जमिनीचे मूळ मालक प्रताप जाधव हे होते. त्यामुळे त्यांच्याकडे निंबाळकर यांनी धनादेश देत जमीन व्यवहाराची पुढील कार्यवाही करण्याचे ठरवले.
दरम्यान, हा धनादेश बॅंकेत वटला नाही. त्यामुळे खटला दाखल होईल, अशी भीती निंबाळकर यांना होती. त्यामुळे ही रक्कम डीडीने देण्याच्या इराद्याने 3 मार्च रोजी त्यांनी कोटक महिंद्रा बॅंकेतून सुमारे 19 लाख रुपयांचे तीन डीडी काढले. दूध संघ वसाहतीतील दत्ता पाटील यांच्या घरी निंबाळकर यांच्यासह त्यांचा मुलगा निखिल, कामगार रणजित विष्णू वाघमारे हे तिघे रात्री साडे नऊच्या सुमारास गेले.त्यावेळी तेथे दत्ता पाटील, सचिन काळभोर (रा. सूर्यनगरी) हे हजर होते. प्रताप जाधव यांनी निंबाळकर यांच्याकडे डीडी व दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली. डीडी काढून आणला आहे, तुम्ही पूर्वीचे चेक द्या, अशी मागणी निंबाळकर यांनी केली.
दरम्यान, जाधव हे चिडून जात निंबाळकर यांचा कामगार रणजित वाघमारे यांना हाताने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. याचबरोबर निंबाळकर यांच्यासह मुलाला शिवीगाळ करण्यात आली. मला लगेच डीडी व पैसे द्या, नाही तर तुम्हाला जीवे मारून टाकतो, असे म्हणून त्याने निंबाळकरांकडून डीडी व दोन लाख रुपयांची रक्कम जबरीने काढून घेतली. भीतीपोटी निंबाळकरांसह त्यांचा मुलगा व कामगार तेथून परत आले.
दुसऱ्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास निंबाळकरांनी सचिन काळभोर यास जाधव यांच्याकडून धनादेश परत आणण्यासाठी पाठवले असता जाधव यांनी ते परत करण्यास नकार दिला. मला 50 लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, नाही तर भिगवण रस्त्यावरचा प्लॉट नावावर करून द्यावा लागेल, तरच मी धनादेश परत करेन, अन्यथा निंबाळकरांच्या कुटुंबाला ठार मारणार आहे, अशी धमकी त्याने दिली. भीतीपोटी गेली दोन आठवडे तक्रार दाखल केली नव्हती. परंतु कुटुंबीयांनी धीर दिल्यानंतर फिर्याद दाखल केली.
घटनेचे रेकॉर्डिंग उपलब्ध
तीन मार्च रोजीच्या भेटीत डॉक्टरांनी संबंधितांबरोबर चर्चा करताना खिशातील मोबाईलचे रेकॉर्डिंग सुरु ठेवले होते. त्यामुळे पैसे मागण्याचा हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर करीत आहेत.