घोडगंगा कारखाना ः 17 ऑक्टोबरला निकाल तोपर्यंत निवडणूक जाहीर करण्यास मनाई
पुणे – न्हावरे (ता. शिरूर) घोडगंगा सहकारी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली होती; मात्र राज्य शासनाने अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे 15 जुलै रोजीच्या आदेशाने 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित केली होती. निवडणुकीसाठी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी ऊस उत्पादक शिरूर गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीअंती तो अर्ज वैध ठरला.
11 ऑगस्ट रोजी पाचर्णे यांचे निधन झाले. पाचर्णे यांच्या निधनानंतर घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला पत्र पाठवून मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार फेरनिवडणूक घ्यावी लागणार असल्याचे चित्र असताना सत्ताधारी, विरोधक यांच्याकडून न्यायालयात हरकत, याचिका दाखल झाल्या. अखेर आज (4 ऑक्टोबर) न्यालयात सुनावणी झाली. त्यवर 17 ऑक्टोबरला निकाल अपेक्षित आहे; तूर्तास तापर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास स्थगिती देण्यात आली आली. याचा अर्थ कारखान्याचा गळीत हंगाम निवडणुकीपूर्वीच सुरू होणार आहे. आणि दिवाळी झाल्यावरच निवडणुकीचे फटाके फुटणार असल्याचो स्पष्ट झाले आहे.
निवडणूक अधिकारी यांच्या 31ऑगस्टच्या पत्रानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी निवडणूक अधिकारी दिग्विजय आहेर यांना पत्र पाठवून आदेश व मार्गदर्शन दिले. या पत्रामध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने स्पष्टपणे नमूद केले. उमेदवाराच्या मृत्यूची बातमी मिळताच सदर संस्थेची निवडणूक प्रत्यदेशित करणेबाबत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय आदेश पारित करणे आवश्यक आहे. त्याबाबत प्राधिकरणाचे आदेश, मार्गदर्शक सूचना पारित केल्याचे नमूद केले आहे. तसेच निवडणूक प्रत्यादेशित करणे खात्री अंती त्वरित कार्यवाही करून दि. 30 सप्टेंबरपर्यंत होणारा सुधारित निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाच्या मान्यतेसत्व सादर करण्याचे आदेश दिले होते.
कारखाना आर्थिक अडचणीत व तोट्यात असताना आमदार व अध्यक्ष सभासदांच्या पैशाची नाहक उधळपट्टी करताना दिसून येत असल्याचा आरोप माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, ऍड. सुरेश पलांडे, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर फराटे इनामदार व बाजार समितीचे संचालक राहुल गवारे यांनी केला आहे. यावेळी सरकार पक्षाकडून ऍड. दिलीप पाटील बनकर तसेच घोडगंगा किसान क्रांती पॅनेलतर्फे राहुलदादा गवारे यांचेकडुन ऍड. अजिंक्य उडान, ऍड. सुरेश पलांडे, घोडगंगा कारखाना व आमदार पवार यांच्याकडून ज्येष्ठ वकील ऍड. जहागिरदार, ऍड. राणे यांनी काम पाहिले.
असे आहे प्रकरण
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दि.18 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कारखाना निवडणुकीबाबत प्रत्यादेश 13 सप्टेंबर रोजी जाहीर केला. तसे कारखाना प्रशासनास कळविले. निवडणूक अधिकारी यांच्या फेरनिवडणूक प्रक्रियेच्या विरोधात कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार हे मुंबई उच्च न्यायालयात गेले असून, याचिका दाखल केली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेरनिवडणूक प्रक्रिया करून पुनःश्च अर्ज भरण्याची संधी देण्याचे आदेश 13 सप्टेंबर रोजी पारित केले होते; परंतु स्व. पाचर्णे यांच्या जागेवर नवीन अर्ज येऊ न देण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी हरकत याचिका दाखल केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यावर अनेक तारखा होऊन आज (4 ऑक्टोबर) सुनावणी होऊन 17 तारखेला निकाल देणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.