पुणे – मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एक वस्ती शाळा सिंहगड रस्त्याच्याकडेला गेली पंधरा वर्षे सुरू आहे. सरकारी अनुदान आणि मदतीशिवाय हे विद्यादानाचे कार्य नियमित सुरू आहे. ही मुले चक्क शुद्ध मराठी बोलतात, हे पाहूनही आश्चर्य वाटते. अभिरूची परिसरातून धायरी फाट्याकडे जाताना डाव्या बाजूला ही मूर्तीकारांची वसाहत आहे. राजस्थानातून पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आलेले कलावंत येथे झोपडी टाकून वास्तव्यास आहेत.
दिवसरात्र मूर्ती घडवून त्यांची विक्री करून ही कुटूंब चरितार्थ चालवतात. त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शुभांगी केळकर या कार्यरत आहेत. केळकर यांनी येथे दुपारच्या वेळेत या मुलांना मुळाक्षरे, पाढे आणि अंकज्ञान देण्यास सुरुवात केली. प्लॅस्टिकचे आच्छादन असलेल्या झोपडीवजा जागेत वर्षानुवर्षे ही अनोखी शिकवणी सुरू आहे. सुरुवातीला फक्त पंधरा मुले त्यांच्याकडे यायची. आता ही संख्या तीसपर्यंत पोहचली आहे.
प्राथमिक शिक्षण देण्यासोबतच या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठीही शुभांगी केळकर प्रयत्नशील असतात. सध्या या मुलांना जवळच्या मनपा शाळा आणि काहींना नारायणराव सणस शाळेत प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ पुरवण्याचे कार्य जवळच्याच ऋणा ग्राफिक्ससारख्या व्यावसायिक संस्था करतात. आता या मुलांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता आहे, असे केळकर यांनी सांगितले.
पूर्वी मी सर्व शिक्षा अभियानात कार्यरत होते. नंतर या मुलांच्या शिक्षणासाठी वेळ देते. प्राथमिक शिक्षण देण्यासह त्यांना शाळेतील अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत करते. दानशूर नागरिकांनी मदत केल्यास या मुलांचे शिक्षण सुरळीतपणे पार पडू शकते, असे वस्ती शाळेच्या शिक्षिका शुभांगी केळकर म्हणाल्या.