पिंपरी – सध्या प्रत्येकजण पर्यटनाला खूप महत्व देत असून पावसाळा सुरू होताच पावसाळी पर्यटनासाठी गड, किल्ले, डोंगर, निसर्गाचा अनुभव घेत धबधब्याखाली भिजण्यासाठी बाहेर पडत आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे महसूल वाढावे, प्रवाशांशी नाते प्रस्थापित व्हावे तसेच त्यांना कमी खर्चात सुरक्षितरीत्या निसर्ग व धार्मिक पर्यटन करता यावे, यासाठी एसटी महामंडळाने पावसाळी पर्यटन सेवा योजना सुरू केली आहे. खासगी कंपन्या, खासगी ट्रॅव्हलिंग कंपन्या, रेल्वे यांची स्पर्धा असतानाही या योजनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यंदा पावसाळा उशिरा सुरू झालेला असला आणि अद्याप महाराष्ट्रात म्हणावा तसा पाऊस पडलेला नसला तरी, सुटीचे औचित्य साधून नागरिक दर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीनिमित्त निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटनाला जात आहेत. या पर्यटन प्रेमींना सुरक्षित पर्यटन करता यावे म्हणून पावसाळी पर्यटन सेवा योजना आणली आहे. या योजनेत प्रामुख्याने शनिवार, रविवार आणि तिथीनुसार या सहली आयोजित केल्या जात आहेत. या योजनेत प्रवाशांना सहभागी होण्यासाठी एसटीची साधी गाडी, हिरकणी (निमआराम) या एसटी गाड्यांचा वापर करता येणार आहे.
वल्लभनगर आगारातून संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शन ही एसटी बस सुविधा आहे. त्यासाठी आधी बुकिंग करावे लागते. तर, पंढरपूर, महाबळेश्वर, रायगड, 11 मारुती दर्शन या एसटी बस वाकडेवाडी, स्वारगेट येथून सुटतात. त्यासाठीह आधी बुकिंग करावे लागते, असे आगारातून सांगण्यात आले.
महिलांसाठी सवलत लागू
पर्यटनात महिलाही आता मागे राहिलेल्या नाहीत. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना 50 टक्के ही सवलत लागू रहाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी संख्या वाढावी यासाठी प्रवाशांना विविध सवलती दिलेल्या आहेत. त्यात महिलांसाठी 50 टक्के सवलत लागू केली आहे. पर्यटनासाठी सहभागी होणाऱ्या महिलांना ती लागू होणार आहे.