भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या आशियाई देशांमध्ये क्रिकेट हा खेळ राष्ट्रीय धर्मासारखा पाळला जात असला, तरी जगाच्या उर्वरित भागांमध्ये मात्र फुटबॉललाच धर्म मानला जातो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
कतारमध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये जो संघर्ष झाला तो जगातील अब्जावधी चाहत्यांनी ज्या तीव्रतेने पाहिला ते पाहता फुटबॉलच्या तुलनेमध्ये क्रिकेटची लोकप्रियता काहीच नाही, हेच समोर येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अंतिम सामन्यांमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर मात करून तब्बल 36 वर्षांनी विश्वविजेतेपदावर नाव कोरले आणि या विक्रमी कामगिरीचे श्रेय संपूर्णपणे अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यालाच द्यावे लागणार आहे. ही फुटबॉल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मेस्सी अर्जेंटिनाला विजेतेपद मिळवून देणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाली होती.
जगातील सर्व प्रकारच्या फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचे काम करणाऱ्या मेस्सीच्या अर्जेंटिनाला गेल्या 36 वर्षांमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धा मात्र जिंकता आली नव्हती. पण यावेळी मात्र अर्जंटिनाच फुटबॉल विश्वाची सम्राट असल्याचे मेस्सीने सिद्ध करून दाखवले आहे. अंतिम सामन्यामध्ये दोन गोल करून अर्जेंटिनाला आघाडी मिळाली होती पण शेवटच्या दहा मिनिटांमध्ये फ्रान्सचा स्टार खेळाडू एमबापे यानेसुद्धा आश्चर्यकारक कामगिरी करून दोन गोल केले आणि बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना एक्स्ट्रा टाइम मध्ये वाढवण्यात आला. एक्स्ट्रा टाइममध्येसुद्धा दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ करून तीन-तीन अशी बरोबरी केल्याने फुटबॉल रसिक ज्या क्षणाची वाट पाहत असतात त्या पेनल्टी शूटआउट पर्यंत हा सामना रंगला. पण शूटआउटच्या प्रक्रियेमध्ये मात्र अनुभवाच्या जोरावर मेस्सीच्या अर्जेंटिनाने फ्रान्सवर मात केली. खरेतर शूटआउट सुरू होण्यापूर्वी जो 120 मिनिटांचा खेळ झाला होता त्याच्यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या फ्रान्सच्या खेळाडूंना पेनल्टी शूटआउट मध्ये मात्र तेवढे सातत्य दाखवता आले नाही.
एक तर खेळाडूने मारलेली एक किक अर्जेंटिनाच्या गोलकीपरने अडवली आणि दुसऱ्या एका वेळी फ्रान्सच्या खेळाडूला किक गोलमध्ये पोहोचवताच आली नाही. शूटआउट मध्ये अशा दोन संधी वाया गेल्यानंतर अर्जेंटिना विश्वविजेता होणार याबाबत कोणतीही शंका राहिली नव्हती. पेनल्टी शूटआउटच्या प्रक्रियेमध्येच फ्रान्सच्या खेळाडूंनी अशा प्रकारचा गलथानपणा दाखवल्यामुळेच त्याचे पडसाद सामना हरल्यानंतर लगेचच फ्रान्समध्ये अनेक शहरांमध्ये उमटले होते. पॅरिस, नाइस आणि लियोन या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये दंगली सुरू झाल्या होत्या. युरोपमधील देशांसाठी फुटबॉल हाच धर्म आहे आणि फुटबॉल विश्वामध्ये नेहमीच युरोप विरुद्ध दक्षिण अमेरिका असे शीतयुद्ध चालू असते. त्यामुळे युरोपमधल्या एखाद्या संघाने म्हणजेच ब्रिटन किंवा इटलीने किंवा जर्मनीने जर फ्रान्सला हरवले असते तर फ्रान्सला एवढे दुःख झाले नसते; पण दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनाने फ्रान्सला हरवले हा सर्वात मोठा धक्का फ्रान्सच्या चाहत्यांनाही होता. त्यातूनच ही हिंसक प्रतिक्रिया उमटली.
अर्थात गेल्या काही वर्षांमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या ज्या अंतिम लढती झाल्या त्यामधील सर्वोत्कृष्ट सामना म्हणून अर्जेंटिना आणि फ्रान्समधील या सामन्याचे वर्णन केले जात आहे. कारण एक अंतिम सामना म्हणून चाहत्यांना जे काय हवे असते ते सर्व या अंतिम सामन्याने दिले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फुटबॉल चाहत्यांच्या मनात जे होते तेच या अंतिम सामन्याने घडलेले दिसले. मेस्सीच्या हातात फुटबॉल विश्वचषक असावा अशी त्याच्या कोट्यवधी चाहत्यांची इच्छा होती आणि ही इच्छा यावेळी पूर्ण झाल्याने भारतासह अनेक देशांमध्ये जल्लोष झाला. कोणत्याही खेळाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा जेव्हा अनेक देशांमध्ये खेळली जाते आणि एखादा खेळाडू जेव्हा देशाचे प्रतिनिधित्व करत असतो तेव्हा निश्चितच त्या खेळातील सर्वोच्च स्पर्धा जिंकावे असे त्या खेळाडूचे स्वप्न असते. हे स्वप्न दीर्घकाळ मेस्सी पाहत होता. पण आतापर्यंत हे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. यावेळी मात्र त्याच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या खेळाने आणि नशिबानेही साथ दिल्याने मेस्सीला फुटबॉल विश्वचषक हातात धरून उंचावता आला.
खरेतर सामना जेव्हा एक्स्ट्रा टाइम नंतर पेनल्टी शूटआउटमध्ये जातो तेव्हा काय होईल याबाबत काहीही सांगता येत नाही. दोन्हीही संघांना समान संधी असते; पण फ्रान्सच्या खेळाडूंनी ऐनवेळी अवसान घातकीपणा केल्यामुळेच फ्रान्सला पेनल्टी शूटआउटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. एकीकडे फ्रान्सच्या या पेनल्टी शूटआउटमधील खराब कामगिरीनंतर त्याचे पडसाद फ्रान्समध्ये उमटले असले तरी त्याचवेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन मात्र प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहून आपल्या खेळाडूंचे सांत्वन करतानाही दिसले, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण खेळ म्हटला की त्यात हार जीत आलीच आणि फुटबॉलसारख्या अत्यंत लोकप्रिय खेळामधील हार आणि जीत ही अनेक वेळा मनाला लावून घेतली जाते. अशा वेळी अंतिम सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंना हरल्यानंतर दिलासा देण्याची गरज असते आणि ते कर्तव्य फ्रान्सच्या अध्यक्षांनी पार पाडले.
फुटबॉल हा खेळ असा आहे की, अनेकांना जागतिक क्रीडा विश्वाचा सम्राट बनवतो. मेस्सीने हे सम्राटपद आतापर्यंत भूषवले आहे, कदाचित ही त्याची शेवटची विश्वचषक स्पर्धा असावी. पण जेव्हा एका सम्राटाचा अस्त असतो तेव्हा दुसऱ्या सम्राटाचा उदय होताना दिसतो. उद्याच्या फुटबॉल सम्राटाचा उदय या अंतिम सामन्याच्या निमित्तानेच पाहायला मिळाला.
फ्रान्सचा युवा खेळाडू एमबापे याने ज्या जिद्दीने पूर्ण स्पर्धा खेळली ते पाहता आगामी कालावधीतील एक सुपरस्टार खेळाडू म्हणूनच त्याची गणना केली जाणार आहे. कतारसारख्या छोट्या देशाने ज्या कार्यक्षमतेने या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले आणि स्वतःचे काही नियम लागू करूनही स्पर्धा यशस्वी करून दाखवली हेसुद्धा निश्चितच कौतुकास्पद आहे.