गुजराथची वृत्ती, मला ना तुला, घाल कुत्र्याला- एस. एम. जोशी
मुंबई, ता. 19 – प्रजा समाजवादी पक्षाचे आमदार साथी एस. एम. जोशी म्हणाले, महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. यासंबंधी आमची खात्री झाली असून त्याचे परिमार्जन करण्यासाठी सर्व शांततामय मार्गांचा आम्ही अवलंब केल्यावाचून राहणार नाही. लाठीच्या साह्याने नव्हे तर मन वळविणे व शांततामय मार्गांनी उद्दिष्ट साध्य करू.
गुंडांच्या हाती सापडलेली सुंदर-श्रीमंत विधवा…
श्री. एस. एम. पुढे म्हणाले- मुंबई महाराष्ट्रापासून अलग करण्यात आली तर तिची स्थिती काही गुंडांच्या हाती सापडलेल्या सुंदर-श्रीमंत विधवेसारखी होईल. मुंबईशिवाय महाराष्ट्र म्हणजे देव-मूर्ती नसलेले देऊळ! मुंबईचे रोजचे जीवन महाराष्ट्रावर अवलंबून आहे. खरे म्हणजे मुंबई हे महाराष्ट्राचे हृदयच आहे. गुजराथ प्रदेश कॉंग्रेसच्या मुंबई शहरासंबंधीच्या भूमिकेवर बोलताना श्री. एस. एम. म्हणाले, मला नाही तर तुलाही नाही, घाल कुत्र्याला अशी त्यांची वृत्ती दिसते. मुंबई गुजराथेत येत नसेल तर महाराष्ट्रात विलीन होऊ नये, हे तर्कशास्त्र अजब आहे. प्र. स. पक्षाचे दुसरे एक आमदार श्री. एम. जी. माने म्हणाले, लो. टिळकांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या चालीनुसार मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.
समुद्रपार जाणाऱ्या दूरचित्रवाणीच्या लहरी
वॉशिंग्टन – अमेरिकेकडून युरोपला दूरचित्रवाणीच्या (टेलिव्हिजनच्या) लहरी पाठविणे शक्य आहे, असे ड्यू मॉंट प्रयोगशाळेचे अध्यक्ष श्री. आर. ऍलन ड्यू मॉंट हे सांगतात. येथे भरलेल्या “इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ इंजिनिअर्सच्या’ सभे पुढे बोलताना श्री. ड्यू मॉंट लहरीच्या क्षेपणाच्या (ट्रॉन्समिशन) नवीन तंत्राची माहिती सांगितली. दूर अंतरावर लहरींचे क्षेपण करण्यासाठी “स्कॅटर’च्या तत्त्वाचा उपयोग केला जातो. दूरचित्रवाणीच्या आंतरराष्ट्रीय क्षेपणात युरोप केवळ पहिला टप्पा समजला जाईल.दहा
चित्रमंदिरांपेक्षा एक कारखाना उभारणे गरजेचे
नानगल – “काही माणसं सिनेव्यवसायात पैसा गुंतवतात. सिनेमाला जाणाऱ्यांना माझा विरोध नाही. परंतु या लोकांना या पेक्षा चांगल्यारितीने पैसा गुंतवता येईल. दहा चित्रपटगृहे सुरू होण्यापेक्षा एक कारखाना उभारला जाणे गरजेचे आहे. आज देशाला इतर कोठल्याही गोष्टीपेक्षा कारखान्यांची गरज आहे’, असे उद्गार पं. नेहरूंनी काढले. देशामध्ये पोलाद आणि सिमेंटचा तुटवडा असताना प्रासादतुल्य घरे बांधणाऱ्या लोकांचीही त्यांनी भाषणात हजेरी घेतली.