मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठोबाची पूजा
मुंबई, दि. 14 – पंढरपूरच्या विठोबाची पूजा मंत्र्यांनी करण्यात निधर्मीपणाला काहीच बाध येत नाही, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सांगितले. त्यांचा 55 वा वाढदिवस आज साजरा झाला त्यानिमित्त झालेल्या समारंभाचे वेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की, आषाढी एकादशीच्या दिवशी 19 जुलैला आपण विठोबाची पूजा करणार काय? त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, सरकारतर्फे किंवा एखाद्या मंत्र्याने पूजा करण्यात निधार्मिकतेला काही बाध येतो असे मला वाटत नाही. आषाढी एकादशीला पूजा करण्याची माझी इच्छा आहे.
ऑक्टोबरपासून अनेक नवीन रेल्वेमार्ग
नवी दिल्ली – देशात काही नवीन आगगाड्या सुरू करावयाच्या आहेत व काही रेल्वेमार्गाची वाढ करावयाची आहे, असे निवेदन रेल्वेमंत्री कमलापति त्रिपाठी यांनी त्यांच्या खात्याच्या पार्लमेंटरी सल्लागार समितीच्या बैठकीत केले. ते पुढे म्हणाले, या गाड्या येत्या ऑक्टोबरपासून सुरू होतील. शिवाय 10-12 ठिकाणी नवे मार्ग सुरू करण्यात येतील.
सुप्रीम कोर्टात फोटोग्राफर अडचणीत
नवी दिल्ली – आज भारतीय व विदेशी वर्तमानपत्रांचे प्रेस फोटोग्राफर व टीव्हीचा कॅमेरामन यांनी कोर्टरूमचे छायाचित्र घेतले म्हणून अडचणीत आले आहेत.