रुपयाची किंमत अवघी 25 पैसे!
नवी दिल्ली, दि. 09 – रुपयाची किंमत आणखी घसरली असून गेल्या फेब्रुवारी महिन्यात ती किंमत 25.3 पैसे इतकीच होती, असे सुब्रह्मण्यम म्हणाले. रुपयाची किंमत 25 पैसे झाली त्यामुळे हा आकडा धोकादायक वाटतो खरा; परंतु इतर अविकसित देशाच्या मानाने हा आकडा फारच वाईट आहे, असे म्हणता येणार नाही.
छत्रपती शिवाजी राजे लोककल्याणकारी होते
वाई – शिवाजी राजे उत्तम प्रशासक होते. त्यांची राज्यव्यवस्था आदर्श होती. आपण राजे असलो तरी राज्य जनतेचे आहे याची त्यांना जाण होती. राजे खरे लोककल्याणकारी होते, असे उद्गार प्रा. वसंतराव जगताप यांनी वसंत व्याख्यानमालेत “शिवकालीन राज्यव्यवस्था’ या विषयावर बोलताना काढले.
अक्कलकोट महाराष्ट्रात राहण्यासाठी मोहीम
अक्कलकोट – येथे सध्या अक्कलकोट तालुका महाराष्ट्रातच राहिला पाहिजे, या चळवळीने चांगलेच मूळ धरले असून स्वतःच्या उजव्या अंगठ्याचे रक्त लावून आंगठे करून घेण्याची मोहीम येथील युवक मंडळीने जोरात सुरू केली आहे. आजपर्यंत फुरनूर धरणाबद्दल काहीच घडू शकले नाही व काही होईल असेही वाटत नाही. अक्कलकोट तालुका कर्नाटकात सामील होईल की काय या भीतीने शहरात ही मोहीम सुरू झाल्याचे समजते.
बाजीराव पेशवे पुतळ्यासाठी “स्वामी’चे काही उत्पन्न
पुणे – शनिवारवाड्यात होणार असलेल्या “स्वामी’ नाटकाच्या उत्पन्नातील काही भाग श्रीमंत बाजीराव पेशवे (थोरले) यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी देण्यात येणार आहे.