मणिपूरमध्ये नवे सरकार
इंफाळ, दि. 23 – राजकुमार दोरेन्द्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्य असलेल्या कॉंग्रेस कम्युनिस्ट युतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सकाळी राजभवनात साध्यारीतीने पार पडला. एल. पी. सिंग यांनी शपथ दिली. रैसग, कैसग, राजकुमार रशबीरसिंग, पी. पी. कुडलेग्पाओ, सिनाय विजय सिंग या मंत्र्यांचा आज शपथविधी पार पडला. 74 साली झालेल्या मध्यावधी निवडणुकीनंतर 16 महिन्यांत अस्तित्वात आलेले हे चौथे सरकार आहे.
मिसाविरूद्ध जामीन नाही
नवी दिल्ली – मिसाखाली अटक केलेल्या व्यक्तीस जामीन अथवा जमिनीच्या बॉंडवर मुक्त करण्यास प्रतिबंध करणारे विधेयक केंद्रीय गृहमंत्री रेड्डी यांनी मांडले.
घटना दुरुस्ती विधेयक मंजूर
पुणे – राष्ट्रपती, राज्यपाल व केंद्र प्रदेशाचे प्रशासक यांचे वटहुकूम काढण्याचे अधिकार तसेच राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर करण्यापूर्वी परिस्थितीबद्दल त्यांचे समाधान या गोष्टीविरूद्ध कोर्टात जाण्यास मनाई करणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत 342 विरुद्ध 1 मताने मंजूर झाले.कायदेमंत्री गोखले म्हणाले, या विधेयकामागे सुप्रीम कोर्ट अथवा इतर कोर्टाचा अवमान करण्याचा कोणताच हेतू नाही.
पोर्तुगालमध्ये सामूहिक नेतृत्व
लिस्बन – राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को डी कोस्टा गोम्स, पंतप्रधान वास्को गोंकाल्हेस व राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख ब्रिगेडियर जनरल ओटेलो साराइव्ह डी कार्व्हालो या तिघांचे सामूहिक नेतृत्व पोर्तुगालची सत्ता संपादन करण्याच्या तयारीत आहे.