-माधुरी तळवलकर
स्पर्शाचे किती प्रकार असतात आणि माणुसकीचा स्पर्श असेल तर त्यातून मिळणारे समाधान किती मोठे असते हे “स्पर्श’ नावाची फिल्म सांगते. फक्त माणसाचे वर्तन न पाहता त्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर खूप गोष्टी सोप्या होतील.
आवडत नसलेल्या गोष्टी पोलीस खात्यात कराव्या लागणारा इन्स्पेक्टर नोकरी सोडायचे ठरवतो. तसा राजीनामा लिहितो. दरम्यान, एक फोन आल्याने इन्स्पेक्टर तिथे पोचतो तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर आणि एक युवती भांडत असतात. केके मेनन याने या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका अगदी खरीखुरी वाटावी अशी वठवली आहे. तो मुलीला विचारतो, याने धमकी दिली? छेडछाड केली? ती सगळ्याला नाही म्हणते. तिचे एकच म्हणणे असते, “इसने मुझे हाथ लगाया.’ ड्रायव्हर म्हणतो, “हिने माझी कॉलर पकडली’.
दरम्यान ते शोधून काढतात की, ह्यांच्याबरोबर श्रुती शर्मा नावाची मुलगी टॅक्सीत होती; पण हे भांडायला लागल्यावर ती निघून गेली. सगळ्यांना ते ठाण्यावर आणतात. ती सांगते की, ती मुलगी आधीपासूनच चिडलेली होती. किरकोळ गोष्टीवरून तिने ह्याची कॉलर पकडली आणि त्याने तिचा हात झटकला. त्यावर इन्स्पेक्टर त्या मुलीला मिटवून टाकायला सांगतो, पण ड्रायव्हरला शिक्षा झाल्याशिवाय ती माघार घेणार नसते.
मेनन ड्रायव्हरला आत घेऊन जातो. बाहेर त्याचा आरडाओरडा ऐकू येतो. खूप मार खात असल्यासारखा. श्रुती हळूच दार ढकलून पाहते तर तो ड्रायव्हर निवांत बसून नुसताच ओरडतोय! तक्रार करणारी मुलगी त्याचा ओरडा ऐकल्यावर समाधानाने निघून जाते. मग तो इन्स्पेक्टर त्या ड्रायव्हरलाच श्रुतीला तिच्या घरी सोडायला सांगतो. वाटेत कळतं, श्रुतीचा वाढदिवस असल्याने ती घाईघाईने निघून गेलेली असते. ड्रायव्हर तिला शुभेच्छा देऊन हात जोडतो. ही चक्क त्याच्याशी शेकहॅंड करते. स्पर्श ओळखता यावा लागतो. त्यासाठी माणूस ओळखता यायला हवा.
पण ती मुलगी अशी का वागते? मेनन आणि त्याचा सहाय्यक पोलीसगाडीतून जात असताना अचानक त्यांना दिसते की, ती मुलगी आता रेल्वेपुलावरून जीव देण्याच्या विचारात उभी आहे. मेनन पुढे होऊन तिला विश्वासात घेतो. विचारतो तेव्हा कळते, टॅक्सीत बसण्यापूर्वी तिच्या मित्राशी तिचे जोरदार भांडण झालेले असते आणि त्याची बोटे तिच्या गालावर उमटलेली असतात.
तिच्या डोक्यात तोच स्पर्श असतो… हिंसक! मनःस्थिती क्षुब्ध असते तिची. चूक कोणाचीच नाही. परिस्थिती नाचवते माणसाला. मेनन वैतागलेला असतो. पण सहाय्यक त्याला म्हणतो, “आज कुछ तो बदला ना? ऐसेही एकेक करके बदल जायेगा… तुम नौकरी छोडके मत जाओ!’ एक खूप धीर देणारा, सकारात्मक विचार देऊन फिल्म संपते.