वर्ष 1992 मध्ये जे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये अभयारण्याचे प्रश्न होते ते आज नाहीत, असे नाही तर उलटपक्षी आज तेच प्रश्न उग्र स्वरूपात निर्माण झाले आहेत. आज माणसे अभयारण्यात राहतात का, अभयारण्ये मनुष्यवस्तीत झालेले आहे असा पेच निर्माण झाला आहे. जुन्नर-आंबेगाव-खेड तालुक्यात बिबट्यांची संख्या कधीकाळी बोटावर मोजता येईल एवढी होती ती आज 500 पेक्षा जास्त झालेली आहे.
मुळात पिण्याच्या पाण्यासाठी हे बिबटे डोंगरातून मनुष्यवस्तीकडे येतात व पाणी पिण्यासाठी विहिरीकडे जातात आणि विहिरीत पडतात. यामागचे कारण म्हणजे वनविभागाने जंगलात बिबट्यांना पाणी पिण्यासाठी पाहिजे तेवढे छोटे मोठे पाण्याचे बंधारे तयार केले नाहीत आणि बिबट्यांना शिकारीसाठी अन्य जंगली जनावरांची वाढ केली नाही.
बिबटे आजकाल उसाच्या शेतामध्ये लपून बसतात. त्यांच्या बछड्यांनाही तेथेच जन्म देतात. दिवसभर उसात थांबायचे. शेताबाहेर पडून नागरी वस्तीवरील जनावरांवर हल्ले करायचे. चुकून मनुष्य आला तर त्याच्यावरही हल्ला करायचा, असा हा रात्रीचा खेळ जुन्नर-आंबेगाव-खेड तालुक्यात रोजच चालू असतो. यात अनेक विषयांची गुंतागुंत झालेली आहे.
पिंजरा लावून बिबट्याला वनखाते पकडते, पण पुढे त्या बिबट्याला कुठे सोडले, कुण्या निवारा केंद्रात ठेवले याबाबत माहिती दिली जात नाही. बिबट्याला पकडल्यानंतर त्याला आयडी कॉलर लावावी, अशी वनखात्याची भूमिका होती. एक दोन बिबट्यांना आयडी कॉलर लावली गेली. पुढे त्या योजनेचे काय झाले कुणालाच काही माहिती नाही.
जुन्नरजवळील माणिकडोह धरणाजवळ बिबट्यांसाठी निवारा केंद्र सुरू केलेले आहे. हे केंद्र सुरू झाल्यापासून 300 पेक्षा जास्त बिबटे येथे पकडून आणले, पण पुढे या बिबट्यांचे काय झाले, किती बिबट्यांना आयडी कॉलर लावले, किती बिबट्यांना कुठे कुठे सोडून दिले, याबाबतची माहिती उपलब्ध नाही. बिबट्यांना शिकारीसाठी हरीण, भेकरे, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची पुरेशा प्रमाणात आवश्यकता असते. पण यासारख्या वन्यप्राण्यांची संख्या प्रमाणापेक्षा खूपच घटली आहे.
आता दर दिवसाला एका तरी बिबट्याचे दर्शन नागरिकांना मानवी वस्तीत किंवा शेती परिसरात होतेच. नागरिकांना बिबट्याच्या भीतीपोटी संध्याकाळी लवकरच शेतातून घरी परतावे लागते. वास्तविक नागरिकांनीसुद्धा बिबट्यांच्याबरोबर कसे राहायचे, याची जीवनशैली शिकली पाहिजे. तर बिबट्यांमुळे नागरीवस्तीचे कसे नुकसान होणार नाही याची खबरदारी वनखात्याने प्रखरपणे घेतली पाहिजे.