बिग बजेट ही बॉलीवूडची परंपरा नवीन वर्षातही कायम आहे आणि ही परंपरा यावर्षी कायम राहणार आहे. यंदा शाहरुख खान, सलमान खान आणि रणबीर कपूरचे चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहत्यांसाठी पर्वणी राहणार आहे.
बॉलीवूडच्या इतिहासात सर्वाधिक गाजलेला चित्रपट कोणता, असे जर विचारले तर आपल्या डोळ्यासमोर “शोले’ चित्रपट येतो. या चित्रपटाचे बजेट तीन कोटी रुपये होते. अर्थात, तत्कालीन काळात हे बजेट रमेश सिप्पी यांच्या आटोक्याबाहेरचे होते. तरीही वडील जी. पी. सिप्पी यांच्या मदतीने रमेश सिप्पी यांनी हा चित्रपट पूर्ण केला. या चित्रपटाची लोकप्रियता साडेचार दशकानंतरही कमी झालेली नाही. सांगायचे तात्पर्य एवढेच की, अलीकडच्या काळात बॉलीवूडपटाचे बजेट शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक असूनही ते तिकीटबारीवर यशस्वी ठरताच असे नाही. कधी बजेट वाढवून सांगितले जाते, तर कधी कमी सांगण्यात येते. अर्थात बिग बजेट ही बॉलीवूडची परंपरा आहे आणि ही परंपरा यावर्षी कायम राहणार आहे. यंदा शाहरुख खान, सलमान खान आणि रणबीर कपूरचे चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहत्यांसाठी पर्वणी राहणार आहे. 2023 मध्ये बॉलीवूडच्या काही चित्रपटांना एकत्र केल्यास त्यांचे बजेट एकूण 2500 कोटी रुपये राहील, असे सांगण्यात येत आहे.
नव्या वर्षात बॉलीवूडला खूप अपेक्षा आहेत. कारण करोना काळात बॉलीवूडचे उत्पन्न खूपच कमी झाले आणि कालांतराने प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठच फिरवली. एकीकडे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढत चालली आहे तर दुसरीकडे नवनवीन आरोपांचे बालंट लागत आहेत. नेपोटिज्मसह अनेक मुद्द्याने चर्चेत राहिलेला “बॉलीवूड बॉयकॉट’चा मुद्दा अजून शमलेला नसताना तपास यंत्रणांचा ससेमिरा बॉलीवूडमधील काही कलाकारांच्या मागे लागला आहे. ईडीकडील तक्रारीनुसार करण जोहरच्या “लायगर’ चित्रपटात हवालामार्गे पैशाचा वापर झाल्याचे म्हटले आहे. परिणामी सहनिर्माते चार्मी कौर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांची चौकशीही झाली. नायक विजय देवरकोंडालाही पाचारण करण्यात आले. लायगर हा 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे बजेट 125 कोटी रुपये होते. मात्र, हा चित्रपट आपटला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाइड 56 कोटी रुपये मिळाले. मात्र निर्मात्यांवर काळा आणि हवाला पैशाचा आरोप झाल्याने खळबळ उडाली. एवढेच नाही तर अशा प्रकारचे मोठे नुकसान होऊनही अनेक गुंतवणूकदार नव्या नव्या चित्रपटात पैसा टाकत आहेत. काही जण स्वत:च निर्मिती करत आहेत. विशेष म्हणजे अशा नुकसानीचा त्यांच्यावर का परिणाम होत नाही, हा प्रश्न निर्माण होणे देखील स्वाभाविक आहे. मग चित्रपटाचे खोटेनाटे बजेट मांडले जात आहे का? बजेटच्या नावावर जनता आणि सरकारची फसवणूक तर केली जात नाही ना? हा देखील विचार येतो.
चित्रपट हीट असो फ्लॉप, प्रत्येक वेळी त्याचे फासे निर्मात्यांच्याच हाती कसे असतात, याचे कोडे उलगडत नाही. यासाठी एक उदाहरण पाहू. “ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे बजेट 550 कोटी रुपये असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या कलेक्शनची आकडेवारी हाती आली तेव्हा ते बजेट 410 कोटी रुपयांवर आले. यामागे दोन कारणे सांगता येतील. पहिले म्हणजे मोठ्या बजेटचे आकडे हे चित्रपटाने चांगले कलेक्शन केले तर ठीक, अन्यथा ते बजेट कमी करायचे म्हणजे तो चित्रपट फ्लॉप झाल्याचे कोणीही म्हणणार नाही, असा ठोकताळा काही निर्मात्यांनी बांधला आहे. उत्पन्न हे बजेटपेक्षा अधिक राहिले तर चित्रपटाच्या खर्चाच्या नावावर बहुतांश पैसा काढून घेण्यात येतो. कर कमी भरता यावा म्हणून हा खटाटोप केला जातो. उत्पन्न कमी राहिले तर बजेट कमी सांगून अब्रू वाचविण्याचा प्रयत्न केला जातो. हे एक केवळ एक उदाहरण झाले. मात्र असे अनेक चित्रपट आहेत की त्याचे बजेट प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतर वेगवेगळे असल्याचे दिसून येते. हीच गोष्ट सम्राट पृथ्वीराज चित्रपटाची सांगता येईल. सुरुवातीला या चित्रपटाचे बजेट 250 कोटी रुपये सांगितले होते. विशेष म्हणजे या चित्रपटाची शूटिंग 40 दिवसांतच आटोपली. त्याचा व्हीएफक्सचा दर्जाही चांगला नव्हता. अक्षयकुमारने शंभर कोटी रुपये घेतले असे गृहित धरू, मात्र उर्वरित गोष्टींवर दीडशे कोटी रुपये कशावर खर्च झाले, हा एक प्रश्न आहे. चित्रपट पाहिला तर त्यावर एवढा खर्च झाला असेल, असे वाटत नाही. त्याचे बजेट संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अशा स्थितीत नव्या वर्षाचे आगमन झाले असून यंदाही बिग बजेटच्या चित्रपटांची रांग लागली आहे. अशा बिग बजेट चित्रपटाची माहिती घेऊ.
पठाण : शाहरुख खान हा पठाण चित्रपटातून चार वर्षांनंतर कमबॅक करत आहे. त्याच्यासमवेत दीपिका पदुकोन आणि जॉन अब्राहम हे दोघेही चमकणार आहेत. या चित्रपटाचे बजेट सुमारे अडीचशे कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
मैदान : फुटबॉलच्या कथानकावर आधारित चित्रपट मैदानची निर्मिती खूप अगोदर झाली आहे. मात्र, त्याच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा पुढे ढकलली गेली. या चित्रपटात अजय देवगण नायक आहे. बोनी कपूरने या चित्रपटावर शंभर कोटी रुपये खर्च केले आहेत.
भोला : अजय देवगणचा दुसरा चित्रपट भोला हा तमिळ चित्रपट “कैथी’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट यावर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे टिझर रिलीज झाले असून चाहत्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चित्रपटाचे बजेट देखील 80 ते 100 कोटी रुपये सांगितले जात आहे.
बवाल : वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची आघाडीची भूमिका असलेला बवाल चित्रपटाचे दिग्दर्शन दंगल फेम नितेश तिवारी करणार आहेत. हा चित्रपट वरुण धवनच्या करियरमधील सर्वाधिक बिग बजेट असणारा आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या चित्रपटाचे बजेट 100 ते 130 कोटी रुपये आहे.
किसी का भाई किसी की जान : सलमान खानचे चाहते “किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची दीर्घकाळापासून वाट पाहत आहेत. मल्टीस्टारर असणाऱ्या चित्रपटात सलमान खान याच्यासमवेत पूजा हेगडे, राम चरण, राणा दग्गुबत्ती, व्यंकटेश आणि शहनाज गिल यासारखे स्टार काम करत आहेत. या चित्रपटाचे बजेट सुमारे शंभर कोटी आहे.
रॉकी और राणी की प्रेमकहानी : दीर्घकाळानंतर करण जोहरने चित्रपट दिग्दर्शनाची सूत्रे आपल्या हाती घेतली. “रॉकी और राणी की प्रेमकहानी’मध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंह यांच्यासमवेत धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चनदेखील दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेट 70 ते 80 कोटी रुपये सांगितले जात आहे.
जवान : बहुचर्चित चित्रपट जवानमध्ये शाहरुख खानबरोबर दक्षिणेतील नायिका नयनतारा चमकणार आहे. हा चित्रपट देशभरात पाच भाषांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला असून त्यास चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. या चित्रपटावर तब्बल 200 कोटी रुपये खर्च होत आहे.
आदिपुरुष : रामायणावर आधारित चित्रपट आदिपुरुषचे टीझर जारी करण्यात आले आहे. चित्रपटात प्रभासबरोबर कृति सेनन आणि सैफ अली खान दिसणार आहेत. चित्रपटातील नायकांचा लूक मात्र प्रेक्षकांना आवडला नाही. सुमारे 500 कोटी रुपयांच्या बजेटच्या या चित्रपटात काही बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे बजेट आणखी वाढू शकते.
प्रोजेक्ट के : दक्षिणेतील सुपरस्टार प्रभासने 2023 ची सुरुवात धडाकेबाज केली आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट के चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 170 कोटी रुपये कमावले आहेत. दीपिका पदुकोन देखील या चित्रपटात दिसणार आहे. अर्थात या चित्रपटाचे प्रदर्शन 2024 मध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा असून त्याचे बजेट तब्बल 500 कोटी रुपये सांगितले जात आहे. या चित्रपटाचे आंध्र प्रदेशातील हक्क शंभर कोटी रुपयांना विकले गेले, तर निझाम राइट्स 70 कोटी रुपयांना विकले आहेत.