नवी दिल्ली : ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदरही सोनिया गांधी यांना समन्स बजावण्यात आला होता. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. त्यानुसार आता त्यांना नव्याने समन्स बजावण्यात आले आहेत.
‘नॅशनल हेराल्ड’ कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल गांधींनाही ईडीने समन्स बजावले होते. २ जूनला राहुल यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु राहुल गांधी देशाबाहेर असल्यामुळे त्यांनी आणखी काही दिवसांची मुदत मागितली होती.
दरम्यान, समन्स बजावल्यानंतर काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकार सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच यातून विरोधकांबद्दल असलेली भीती आणि भाजपचे गलिच्छ राजकारण दिसून येत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आदी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मागे सूडबुद्धीने चौकशी लावली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.