सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बबनराव शिंदे यांच्याकडे आता ईडीने आपला मोर्चा वळवला आहे. माढा येथील सूत गिरणीतील गैरव्यवहार आणि साखर कारखान्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या नावे उचललेल्या कर्जप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ईडीची ही पहिलीच कारवाई आहे. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारीतील मोठे नाव असलेल्या आमदार बबनराव शिंदे व त्यांचे सुपुत्र आणि जिल्हा दूध संघाचे नूतन अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे यांच्या सहकारी तसेच खासगी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहाराचा संशय आहेत. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.
आमदार बबनराव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सूतगिरणीच्या व्यवहारात गैरव्यवहार केला असल्याची तक्रार उपळाईचे सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी केली होती. त्या अनुषंगाने चौकशी सुरू झाली असून आमदार शिंदे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
आमदार शिंदे यांच्या कारखान्यासंदर्भात अशाच प्रकारची दुसरी एक तक्रार टेंभुर्णीतील पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी केली होती. त्यामध्ये आमदार बबनराव शिंदे यांच्या कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या नावे परस्पर उचललेल्या कर्जाचे प्रकरण आहे. या दोन्ही तक्रारींची दखल घेत ईडीने आता एकत्र चौकशी सुरू केली असून जबाबाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यामुळे ईडीचे पहिले पाऊल काय ? याची जोरदार चर्चा माढ्यात सुरू झाली आहे.