पिंपरी, (प्रतिनिधी) – मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक वॉरंट निघाल्याचे सांगत एका व्यक्तीकडून ४० लाख रुपये घेत फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २१ आणि २२ मार्च रोजी वाकड येथे घडला. सत्यजित वीरेंद्र कुमार वय (वय ४६, रा. पार्क स्ट्रीट, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी सत्यजित यांना 8808208924 या क्रमांकावरून संपर्क केला त्यांना स्काईप ॲपच्या Mumbaipolice 39 आणि MUMBAI CBI या आयडी वरती जॉईन होण्यास सांगितले. सत्यजित यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रींगची केस झाली असून त्याबाबत त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाले आहे.
रद्द करण्यासाठी सिक्युरिटी रक्कम भरावी लागेल. आम्ही आपण केलेल्या मनी लॉन्ड्रींग मध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपास करणार आहोत. जोपर्यंत हा तपास सुरू आहे तोपर्यंत आपण नॅशनल सिक्रेट रुलनुसार कोणाशीही काहीही बोलू शकत नाही, असे आरोपींनी सत्यजित यांना सांगितले. त्यानंतर सत्यजित यांच्याकडून आरोपींनी ४० लाख रुपये ट्रान्सफर करून घेत त्यांची फसवणूक केली. यापुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.