नवी दिल्ली – पंजाबमधील माजी आमदार सुखपालसिंग खैरा यांना गुरूवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. खैरा यांनी काही महिन्यांपूर्वीच कॉंग्रेसमध्ये फेरप्रवेश केला. त्यामुळे त्यांची अटक पंजाबमधील सत्तारूढ कॉंग्रेससाठी हादरा मानली जात आहे.
अंमली पदार्थांच्या तस्करीच्या 2015 मधील घटनेशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. त्यावरून खैरा ईडीच्या रडारवर आले. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील दोषींशी आणि बनावट पासपोर्ट रॅकेटशी खैरा यांचा संबंध असल्याचा ईडीचा आरोप आहे. त्यावरून याआधी त्या यंत्रणेने खैरा आणि त्यांच्या संबंधितांच्या ठिकाणांवर छापेही टाकले होते. आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खैरा यांना अटक झाली आहे. ते 2017 मधील विधानसभा निवडणुकीत आपच्या तिकिटावर विजयी झाले.
जानेवारी 2019 मध्ये आपला रामराम ठोकून त्यांनी पंजाब एकता पक्षाची स्थापना केली. तो पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करून ते स्वगृही परतले. खैरा यांनी सातत्याने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध दर्शवल्याने केंद्रीय यंत्रणांकडून लक्ष्य केले जात असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात होता.