नवी दिल्ली – जागतिक पातळीवर महागाई वाढण्याचा धोका निर्माण असल्यामुळे सोन्याकडे गुंतवणूक वळू लागली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
गुरुवारी सोन्याचा दर तब्बल 883 रुपयांनी वाढून 48,218 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,890 रुपयांनी वाढून 65,190 रुपये प्रति किलो झाला. सकाळच्या सत्रामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 18 पैशाने कोसळल्यामुळेही सोन्याच्या दरावर परिणाम झाला असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,856 डॉलर व चांदीचा दर 24.89 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, महागाई वाढणार असल्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी काही गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्याची शक्यता वाढली आहे.
महगाई वाढण्याच्या शक्यतेमुळे अमेरिका आणि इतर देशांच्या रिझर्व बॅंका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय नागरिकांना सध्या तूलनेने कमी दरावर सोने उपलब्ध आहे. लग्नसराईसाठी नागरिकांनी सध्याच्या पातळीवर सोने खरेदी करण्यास हरकत नाही. नंतर सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
भारतातील वायदे बाजारात सोन्याच्या किमती 49,292 रुपये प्रति दहा ग्रॅम या 9 महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या किमती वाढत राहण्याची शक्यता गृहीत धरली जाऊ लागले आहे.
केपी रीसर्च कमोडिटीचे उपाध्यक्ष अमित खरे यांनी सांगितले की, चीननंतर अमेरिकेतही महागाई वाढत असल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याचा आश्रय घेऊ लागले आहेत. त्यांनी सांगितले की, साधारणपणे दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सोन्याच्या किमती वाढत असतात. या वर्षीही त्या वाढण्याची शक्यता आहे. दीर्घ पल्ल्याचा विचार केल्यास सोन्याच्या किंमती वाढू शकतात. दरम्यानच्या काळामध्ये परिस्थितीजन्य कारणामुळे सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले तर ती खरेदीची संधी आहे, असे बऱ्याच विश्लेषकांनी सुचविले आहे.