कोलकता – बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी हिने गुरूवारी भाजपला रामराम ठोकला. त्यामुळे पश्चिम बंगालची सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगलेल्या भाजपला लागलेले गळतीसत्र कायम राहिले आहे. बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीआधी श्रांबतीने भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पक्षाच्या तिकिटावर तिने निवडणूकही लढवली. मात्र, तिला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर श्राबंती भाजपशी अंतर राखूनच होती.
अखेर तिने भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. बंगालच्या हितासाठी भाजप प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्या पक्षाबरोबरचे संबंध तोडत असल्याचे तिने ट्विटरवरून म्हटले. श्राबंतीची इच्छा असल्यास प्रवेश देण्याबाबत विचार करू, असे म्हणत बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने भाजपला डिवचले.
विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर त्या पक्षाला ओहोटी लागली आहे. निवडणुकीआधी भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. काही आमदारही स्वगृही (तृणमूल) परतले. त्यामुळे निवडणुकीआधी भरती अनुभवलेल्या भाजपला आता उलट स्थितीला सामोरे जावे लागत आहे.