मुघल आणि ब्रिटिशांमुळेच भारतामध्ये आर्थिक मंदी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा

नवी दिल्ली : देशातील आर्थिक मंदीवरून सर्वच स्तरातून सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशातल्या आर्थिक मंदीला मुघल आणि इंग्रज सरकारला जबाबदार धरले आहे. मुघल सम्राट आणि ब्रिटिशांनी भारतावर हल्ले केल्याने भारतामध्ये आर्थिक मंदी आल्याचे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. ते वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये (डब्ल्यूएचईएफ) बोलत होते.

देशातल्या आर्थिक मंदीवर सर्वच जण आपापले मत व्यक्‍त करत आहेत. त्यातच आता योगी आदित्यनाथ यांनी अजब तर्क लावला होता. यावेळी बोलताना, मुघल काळ सुरु होण्याअगोदर भारताचा जागतिक व्यापारामधील हिस्सा हा 36 टक्‍क्‍यांपर्यंत होता. त्यानंतर भारतामध्ये इंग्रजांचे आगमन झाले आणि हा हिस्सा 20 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाला. मुघल आणि ब्रिटिशांमुळेच भारतामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये घसरण झाली, असे मत योगी यांनी नोंदवले. देशामध्ये आर्थिक मंदीची स्थिती निर्माण झाली असतानाच मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डब्ल्यूएचईएफ परिषदकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही अर्थतज्ज्ञांनी भारतामधील आर्थिक विकास कमी दराने होत असतानाच त्याचा उल्लेख हिंदू ग्रोथ रेट असा केला होता. मात्र इंग्रजांना महान समजणाऱ्यांनी भारताचा विकास दर केवळ चार टक्कांवर आणला. मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर परिवर्तन झाले आहे, असं मत योगी यांनी मांडले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये उद्योगांना भरपूर संधी असल्याचे म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.