वाहतूक विभागाकडून दंड : हायड्रोलिक टोईंग क्रेनमुळे कामे सोपी
पुणे – दिवसेंदिवस विस्तारत असणाऱ्या शहरात पार्किंगचा प्रश्न अत्यंत गंभीर होत आहे. शहरात पुरेशी पार्किंगची व्यवस्था नसल्याने पुणेकर वाहने “बेशिस्तपणे’ उभी करतात. मात्र, याच बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक विभाग कारवाईचा चांगलाच दणका देत आहे. मागील महिन्यांत वाहतूक विभागाने सुमारे 15 हजार वाहनांवर कारवाई केली आहे.
शहरातील “नो-पार्किंग झोन’ आणि बेशिस्त लावलेल्या वाहनांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. शहरातील मध्यवर्ती भागांतील पेठांसह उपनगरांमध्ये देखील मागील काही दिवसांमध्ये कारवाईचा जोर वाढला आहे.
पर्यायाने वाहतूक कोंडी निर्माण होते. बेशिस्त पद्धतीने लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करत वाहने जप्त करतात. वाहने जप्त करताना अर्थात टेम्पोमध्ये ठेवताना अनेकदा वाहनांचे नुकसान होते. त्यामुळे कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागाकडून कारवाईसाठी “हायड्रोलिक टोईंग क्रेन’चा वापर करण्यात येतो. मागील काही महिन्यांपूर्वी वाहतूक विभागामध्ये चारचाकी गाड्यांसाठी 6 हायड्रोलिक टोईंग क्रेन तर दुचाकी गाड्यांसाठी 22 हायड्रोलिक टोईंग क्रेन दाखल झाल्या आहेत. या क्रेनमुळे वाहतूक पोलिसांचे काम सोपे झाले आहे. या नव्या टोईंग क्रेनमुळे वाहनांचे नुकसान कमी होण्यास मदत होत आहे.
दुचाकीसाठी 436, तर चारचाकीसाठी 672 दंड
“नो-पार्किंग’ झोनमध्ये लावण्यात येणाऱ्या दुचाकीसाठी 436 रुपये तर चारचाकीसाठी 672 रुपये आकारले जातात. यापूर्वी दुचाकींना 200 रुपये दंड आणि टोईंगचे 50 रुपये असे एकूण 250 रुपये आकारले जात होते. तर चारचाकी वाहनांसाठी 200 रुपये दंड आणि टोईंगचे 200 असे 400 रुपये आकारण्यात येत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून 18 टक्के जीएसटीची भर यामध्ये पडली आहे. त्यामुळे वाहन “नो-पार्किंग’मध्ये उभे करणे “बेशिस्त’ पुणेकरांना महाग पडत आहे.