अन् चोरट्यांनी दाखवली माणुसकी
सुभाष कांबळे हा चालक आपली पिकअप जीपसह पंपावर झोपलेला होता. त्याच्या गाडीच्या काचा फोडून त्याला हत्याराचा धाक दाखवत त्याच्याकडील सहा हजार रुपये घेतले मात्र कांबळे याने साहेब माझे सगळेच पैसे चालवले, तुम्ही मला पुढे टोलनाका भरण्यासाठी पैसे द्या नाहीतर मी कसा जाणार ? अशी विनंती केल्यावर चोरट्यांनी माणुसकी दाखवत दोनशे रुपये देऊन पोबारा केला.
नेवासे/सोनई – नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव- पांढरीपूलच्या दरम्यान असलेल्या मिलिंद मच्छिंद्र पागिरे यांच्या मालकीच्या मनिषा पेट्रोलियम या पेट्रोलपंपावर पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लूट केली. पंपावरील कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कम व मोबाइल घेऊन चोरटे पसार झाले. यामुळे मात्र परिसरात खळ्बळ उडाली आहे. या चोरट्यांनी येथील एका वाहन चालकाला दम देत हल्ला करून जखमी केल्याचे समजते.
शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास नगरकडून मोटरसायकलवर दहा ते बारा तरुणांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. त्यांच्या हातात कोयते, कुऱ्हाड, तलवारी, गलोल अशी हत्यारे होती. आदिनाथ नामदेव थोरात (रा.लोहारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास काही अनोळखी इसमानी हातात लोखंडी कट्टी, लकडी दांडके व गलूल याचा धाक दाखवत दोन मोबाइल व कामगारांच्या खिश्यातील 39 हजार 500 रूपयांचा माल चोरून अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पोबारा केला. आदिनाथ आढाव यांच्या फिर्यादीवरून अनोळखी अंदाजे 10 – 15 जणांविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक थोरात हे करत आहेत. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे, पोलिस निरीक्षक रणजीत डेरे आदिसह पथकांनी भेटी दिल्या आहेत.