कराड – येथील कोल्हापूर नाक्यावर पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर सुरू असलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या कामाची खा. उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. याप्रसंगी सदरच्या कामादरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत कामाचे कंत्राटदार डी. पी. जैन, तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागांचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. तसेच योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही याप्रसंगी खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्या.
यावेळी माजी आ. आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, विजय वाटेगावकर, सुनील काटकर, स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, निशांत ढेकळे, राहुल खराडे, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील, नितीन काशिद, आर. टी. स्वामी, प्राधिकरणचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कोल्हापूर नाका ते मलकापूर दरम्यान नवीन सहापदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.
यासाठी सातारा-कोल्हापूर लेनवरील कोल्हापूर नाका येथील उड्डाणपुलाचे पाडकाम करण्यात आले आहे. तर कृष्णा हॉस्पिटल समोरील भराव पूलही पाडण्यात येणार आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाबाबतचा नक्की आराखडा काय आहे, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. राजेंद्रसिंह यादव यांनी याबाबत खा. उदयनराजे भोसले यांच्या निदर्शनास आणले होते. याची दखल घेत खा. उदयनराजे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेत माहिती घेऊन आवश्यक सूचना दिल्या. नवीन पुलाचा आराखडा व महामार्गासाठी भूसंपादित केलेल्या जागा याबाबतही चर्चा केली.