न्हावरे -कोंढवा (पुणे) येथील करोनाग्रस्त मावशीच्या संपर्कात आलेल्या शिरूर तालुक्यातील कोकडेवाडीच्या एकाच कुटुंबातील 10 जणांचे करोना तपासणी अहवाल मंगळवारी (दि. 23) रात्री निगेटिव्ह आल्यामुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे न्हावरे परिसरातील भीतीचे सावट दूर झाले पूर्व शिरूर तालुका करोना मुक्त झाला असल्यचे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांनी खबरदारी म्हणून मुंबई,पुणे किंवा दूर गावांवरून ग्रामीण भागातील गावांमध्ये आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यासाठी आरोग्य विभागाला मदत करावी.तसेच याबाबतची माहिती कोणीही लपवून ठेऊ नये. संबंधित बाहेरून आलेल्या किंवा गेलेल्या व्यक्तींची माहिती ग्राम प्रशासनाला व आरोग्य विभागाला कळवावी. त्याचप्रमाणे शक्यतो बाहेरच्या लोकांशी संपर्क टाळावा. नागरिकांनी विनाकारण बाहेर जाणेही टाळावे, असे आवाहन शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी केले आहे.