“ई-बस’ला मिळतेय पसंती!

तिकीट दर समान असल्याने प्रतिसाद : साध्या बसच्या तुलनेत अधिक उत्पन्न

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीच्या) ताफ्यात दाखल झालेल्या नवीन “ई-बस’ला प्रवाशांची पसंती मिळत आहे. साध्या व नवीन अलिशान बसचा तिकीट दर समान असल्याने प्रवासी या बसचा जादा वापर करीत आहेत. त्यामुळे साध्या बसच्या तुलनेत चांगले उत्पन्न “ई-बस’ला मिळत आहे.

उतरती कळा लागलेल्या पीएमपीकडून सुधारणेसाठी काही सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ई-बसेस व सीएनजी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या. या बसचा चांगला प्रभाव सध्या पहायला मिळत आहे. साध्या आणि जुन्या बसच्या तुलनेत “ई-बस’चे उत्पन्न वाढत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्याने दाखल झालेल्या 75 गाड्यांना मोठा प्रतिसाद मिळत असून महसुलात सुद्धा भर पडत असल्याचे पीएमपीचे अधिकारी सांगतात. नवीन ई-बसेसच्या सुविधा बघून प्रथम या गाड्याचे तिकीट सारखेच कसे असेल असा प्रश्‍न सुद्धा पडत होता. मात्र, जुन्या तिकीटाइतकेच तिकीट असल्याने नागरिकांनी या बसेसला मोठी पसंती दिली आहे.

भेकराईनगर आगारात 50 तर निगडी आगारात 25 ई-बसेस आहेत. त्यात 9 फुटी 25 नॉन बीआरटी तर, 12 फुटी 50 बीआरटी बस आहेत. जुन्या पीएमपीच्या गाड्या रस्त्यात कुठे बंद पडतील याचा नेम नाही म्हणून प्रवासी जुन्या गाडीत न बसता ई-बसेसची वाट बघत त्या बसनेच प्रवास करीत आहेत. तर, पिंपरी येथील महेश कुकडे या युवकाने सांगितले की, आम्ही पीएमपीने प्रवास करणे सोडले होते. मात्र, नवीन बसेस या प्रवासास उत्तम असल्याने पुन्हा पीएमपीच्या ई-बसने प्रवास करीत आहे.

“ई-बस’ला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रवासी आवडीने बसत आहेत. साध्या बसेसच्या तुलनेत “ई-बस’ची कमाई जास्त होत असून येत्या काळात अजून “ई-बस’ पीएमपीच्या ताफ्यात होणार आहेत.
– किरण बोराडे, “ई-बस’ व्यवस्थापक, निगडी आगार.

Leave A Reply

Your email address will not be published.