पिंपरी – विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 18 उमेदवारांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये 15 उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च सादर केला आहे. तीन उमेदवारांनी अद्याप खर्च सादर केलेला नाही. त्यांना दैनंदिन खर्च सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची टिपणे सादर करण्यासाठी दिलेल्या नोंदवहीची तपासणी शुक्रवारी (दि. 11) निवडणूक खर्च निरीक्षकांकडून करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील खर्चाची तपासणी त्यामध्ये करण्यात आली. उमेदवारांनी केलेल्या खर्चाची दैनंदिन माहिती त्यांना द्यावी लागत आहे.
दरम्यान, खर्च नोंदवही तपासणीच्या वेळी युवराज दाखले, चंद्रकांत माने, मुकुंदा ओव्हाळ हे तीन अपक्ष उमेदवार अनुपस्थित होते. त्यांनी अद्याप पहिल्या टप्प्यातील खर्च सादर केलेला नाही. दरम्यान, आता उमेदवारांना दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे 15 आणि 19 तारखेला देखील दैनंदिन खर्च सादर करावा लागणार आहे.