1,051 शाळांच्या बॅंक खात्याच्या माहितीत चुका

अनुदान वितरित करण्यास प्राथमिक शिक्षण संचालनालयास अडथळा

पुणे  – राज्यातील 1 हजार 51 शाळांच्या बॅंक खात्याची माहिती चुकीची असल्याने या शाळांच्या खात्यावर शालेय पोषण आहार योजनेचे अनुदान वितरित करण्यास प्राथमिक शिक्षण संचालनालयास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

विविध जिल्ह्यातील शाळांमध्ये शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेचे अनुदान थेट शाळांच्या बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. शाळांचे इंधन, भाजीपाला, धान्य मालासाठी अनुदान देण्यात येते. अनुदान शाळांच्या खात्यावर आरटीजीएस पद्धतीने जमा करण्याकरीता “एमडीएम पोर्टल’मध्ये तालुका लॉगिनवरून शाळांच्या बॅंक खात्याची माहिती अद्ययावत करण्याबाबत वारंवार निर्देश देण्यात आले होते. मात्र बऱ्याचशा शाळांनी माहिती अपडेट करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही.

शाळांच्या बॅंक खात्याची चुकीची माहिती असल्याने त्यांचे अनुदानच जमा होऊ शकलेले नाही. त्यामुळे शाळांना मुदतीत अनुदान मिळालेले नाही ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. ज्या शाळांच्या बॅंक खात्याची माहिती चुकीची आहे अशा शाळांचा बॅंक खात्याचा तपशील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

या शाळांकडून बॅंक खात्याच्या पासबुकची झेरॉक्‍स तत्काळ घेऊन त्यांच्या बॅंक खात्याची माहिती अचूकपणे अद्ययावत करून प्राथमिक शिक्षण संचालनालयास 15 ऑक्‍टोबरपर्यंत विनाविलंब सादर करण्यात यावी, असे आदेश शालेय पोषण आहार योजनेचे राज्य समन्वय अधिकारी दिनकर टेमकर यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी यांना बजाविले
आहेत.

अचूक माहिती सादर करावी

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्याचे अनुदान 16 व 17 ऑक्‍टोबर रोजी शाळांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यापूर्वी शाळांच्या बॅंक खात्याची माहिती अचूक सादर करणे आवश्‍यक आहे. अन्यथा शाळांना अनुदान प्राप्त होणार नाही. 25 ऑक्‍टोबरपासून दीपावली सणास सुरुवात होणार आहे. अनुदानापासून अन्न शिजविणारी यंत्रणा वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवरच निश्‍चित करण्यात येणार आहे, असा इशाराही टेमकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.