प्रकाश राजेघाटगे
पुसेगाव -सध्या जिल्ह्यात विविध ठिकाणी अल्पवयीन मुलांसह तरुणांना “दम मारो दम’ ची क्रेझची चटक लागलेली आहे. एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात चहाचा कप घेवून धुम्रपान करत असलेली ही तरुणाई हॉटेल व पानटपरीवर पाहण्यात मिळत आहे. या तरुणाईला व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रबोधनाची गरज व्यक्त होत आहे.
अल्पवयीन मुल आणि तरूण मोठ्या स्टाईलने सिगारेट धुम्रपान करत आहेत. जिल्ह्यातील सर्व शहरासह ग्रामीण भागात धुम्रपान करणाऱ्या अल्पवयीन मुलासह तरूणांसाठी वेगळी खास व्यवस्था केली जाते. चहा टपरीच्या बाजूला छोटीशी जागा धुम्रपान करणाऱ्यासाठी तयार केली जाते. तसेच हॉटेलमध्ये सुद्धा धुम्रपान करणाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था केली जात असून अल्पवयीन मुल व तरुण एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात चहाचा कप ठेवतात. एकदम सिगारेटचा दम मारला की एक घोट चहाचा घेतात. ही स्टाईल म्हणावी की तरुणांला लागलेले व्यसन ? असा प्रश्न पाहणाऱ्यांना पडतो.
धुम्रपान करण्यात शाळकरी विद्यार्थीसह तरूणांचा मोठया प्रमाणात समावेश आहे. शाळा महाविदयालय सुटल्यावर सर्वात पहिले एक दम … सिगारेट सोबत एक कप चहाचा घोट घेतल्याशिवाय तरुण घरी जात नाहीत. सकाळ-दुपार व संध्याकाळ अशावेळी सर्वाधिक तरुण सिगारेटचा “दम’ मारताना दिसून येतात. अल्पवयीन मुल व तरुणाई धुम्रपानाच्या विळख्यात दिवसेंदिवस अडकत असून या गंभीर बाबीकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.
धुम्रपानमुळे सर्वात जास्त परिणाम आपल्या फुफूसावर होतो. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना फुफुसाचा कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. धुम्रपान हे फुफुस कॅन्सरचे 90 टक्के कारण असते. प्रजननसंस्थेवर ही धुम्रपानामुळे घातक परिणाम होत आहेत. यामुळे पुढची पिढी असणारी अल्पवयीन मुलासह तरुणाई स्वतःच्या हाताने सिगारेटचा धुर्रर्र … घेत कर्करोगाकडे जात असल्याचे दिसत आहे. यामध्ये पालकांकडून घेतलेला पॉकेटमनी अशा प्रकारे व्यसनावर खर्च होत असेल तर पालकांनी याची गांभीर्याने दखल घेत आपला मुलगा नेमके असे करत असेल त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
तरुणांची धूम्रपान स्टाईल
तरुण मुल स्टाईलिश म्हणून ही धुम्रपान करत आहे. आपल्याला हाटके स्टाईलमध्ये सिगारेट तोंडात ठेवणे, पेटविणे आणि पेटविलेल्या सिगारेटमधून धूर्रर्र बाहेर काढणे. चारचौघात सिगारेटचा दम मारणे ही एक आजच्या युगात तरूणांची स्टाईलच झाली आहे.
हॉटेल व पानटपरीवर
धुम्रपानासाठी व्यवस्था
शहरी असो की ग्रामीण भागातील पान टपरी असो की चहा टपरी. येथे तरुणांसाठी धुम्रपान करण्याऱ्यासाठी वेगळी व्यवस्था केली जाते. आडोसा असणाऱ्या ठिकाणी सर्वाधिक धुम्रपान करणाऱ्या अल्पवयीन मुलांसह तरुणांची गर्दी सर्वाधिक असते.