जलवाहिनी दुरुस्तीसाठी सेन्सर कॅमेऱ्याचा वापर
सेन्सर कॅमेरे वापरून
करणार श्रमाची बचत
इंडेक्स सेन्सर कॅमेऱ्यांची
होणार जीएम पोर्टलवरून खरेदी
जलवाहिनीच्या आत दोनशे मीटरपर्यंत कॅमेरा जाण्याची सुविधा
इंडेक्स कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंगची सुविधा
पहिल्या टप्प्यात चार कॅमेरा खरेदी, दहा लाखाची तरतूद
सातारा – सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हायटेक पाऊल उचलले आहे. जलवाहिन्यातील अडथळे काढण्यासाठी खोदकामा ऐवजी सेन्सर कॅमेरा वापरून दुरुस्ती केली जाणार आहे. वाहिनीमध्ये अडकलेल्या कचऱ्याचे किंवा इतर अडथळ्याचे नेमके ठिकाण सेन्सर कॅमेऱ्याद्वारे शोधले जाणार आहे. या कॅमेऱ्यामुळे रस्ते खुदाईसह दुरुस्तीच्या कामासाठी होणारा जास्तीच्या खर्चात आणि श्रमात बचत होणार आहे.
सातारा शहराच्या मध्य आणि पश्चिम भागाला कास उरमोडी आणि कन्हेर पाणीपुरवठा योजनांमधून पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या पूर्व भागाला जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कृष्णा उद्भवतात पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या विविध भागात पाणी साठवण्यासाठी तेरा टाक्यांचे जाळे उभे करण्यात आले आहे पाण्यांच्या टाक्यांची दुरुस्ती हा अतिशय गुंतागुंतीचा आणि अडचणीचा विषय आहे. टाक्यांना पुरेसे संरक्षण आणि दुरुस्ती नसल्यामुळे येथे गळतीचे प्रमाणही जास्त आहे. टाक्यांमध्ये आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या दगड इतर कचरा यामुळे पाण्याच्या दाबावर परिणाम होत आहे. ती जलवाहिनी खोदून पुन्हा दुरुस्त करणे हे खर्चिक होत असून वेळ काढू पण असे काम होत आहे.
त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने सेंसर इंडक्शन कॅमेरा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सेन्सर इंडक्शन कॅमेरा जलवाहिनी नेमका कचरा गाळ किंवा अडथळे कोठे आहेत हे दाखवून देणार आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये चार इंडक्शन कॅमेरे खरेदी करण्याचा सातारा पालिकेचा मानस आहे. हा कॅमेरा सुमारे 200 मीटर लांब पर्यंत जाऊन तपासणी करू शकतो. या कॅमेऱ्यातून संपूर्ण रेकॉर्डिंग केले जाण्याची यामध्ये सुविधा आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष घटनास्थळावर अतिशय सुलभतेने कॅमेऱ्याच्या साह्याने जलवाहिनी आणि दुरुस्त करू शकणार आहेत.