सातारा – वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांची संख्या तसेच विस्तारलेला डोंगराळ भाग लक्षात घेता या पोलीस ठाण्याला सध्या असलेले मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे सर्वत्र लक्ष देताना पोलिसांना अनंत अडचणी येत असल्याने वडूज पोलीस हतबल झाले आहेत. मात्र, याच परिस्थितीचा उलटा फायदा घेत, स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्या धनाजीरावांची मात्र, चांगलीच तंतरली आहे.
सोमवारी दै. “प्रभात’ने “सुस्त वडूज पोलिसांमुळे फळकुट दादांची दहशत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांनी त्यांची भूमिका मांडताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बऱ्याच अडचणी येत असल्याची भावना व्यक्त केली.
वडूज परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू, ताडी, जुगार, क्लब, वाळू वाहतूक या व्यवसायामुळे तरुण पिढी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तर काहींच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.
एवढे होऊनही पोलीस प्रशासनाकडून अशा धंद्यांवर केवळ अपुऱ्या मनुष्यबळामुळे ठोस कारवाई करताना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम करताना मर्यादा पडत आहेत. वडूज पोलिसांचा कारभार वाळूभोवती सुरू असल्याने फळकुटदादांची दहशत वाढली आहे. पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या पाच गुन्ह्यांपैकी केवळ तीन, घरफोडीच्या 13 पैकी केवळ तीन गुन्ह्यांचा, चोरीच्या 42 गुन्ह्यांपैकी 27 गुन्ह्यांचा तपास लावला गेला आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने गुन्हेगारी बोकाळली आहे.
याच पोलीस ठाण्याच्या सीमावर्ती भागात बनावट दारूच्या व्यवसायामुळे पूर्ण परिसर ढवळून निघाल्याचे वृत्त “प्रभात’मध्ये सोमवारी प्रसिध्द झाले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांनी त्यांची भूमिका “प्रभात’कडे व्यक्त केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विस्तार अन् भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, आमच्याकडे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. कारवाई करताना अनेक अडचणी निर्माण होतात, तरीही आम्ही आहे त्या मनुष्यबळावर कायदा सुव्यस्था राखण्याचे काम करत आहोत, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
शैक्षणिक सुविधा व इतर कारणांमुळे वडूज पोलीस ठाण्याला येण्यासाठी कर्मचारी इच्छुक नसतात. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना याठिकाणी बरेच वर्षं काम करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांविरोधात लोकांच्या काही तक्रारी येथील त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. तक्रारींचा अहवाल पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार आहोत.
अशोक पाटील , पोलीस निरीक्षक, वडूज.