पुसेगाव – श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ होत असलेल्या यात्रेनिमित्त मंगळवार, 24 रोजी काटा कुस्त्यांचे जंगी मैदान भरणार आहे. यावेळी दिल्ली येथील तेजसिंगआखाडा, हरियाणातील लाडपूर येथील लिल्ल आखाडा व बहादूरग येथील धर्मवीर आखाडा, पंजाब येथील मुल्लापूर आखाड्याचा गोलु पैलवान यासह तसेच राज्यातील प्रसिध्द तालिमीतील पैलवानाच्या लढती होणार आहेत.
काटा कुस्त्यांसाठी प्रसिध्द असलेल्या या मैदानात यंदा विजेत्या पैलवानांना दहा लाखांपेक्षा अधिक इनामे देण्यात येणार आहेत. दरम्यान, हरियाणाचा चपळ पैलवान उमेश मथुरा विरुध्द हरियाणाचा हितेश काला तसेच महाराष्ट्राचा उगवता तारा माऊली जमदाडे विरुध्द पंजाबचा हट्दी इराण, पुण्याचा कौतुक डाफळे विरुध्द झटपट कुस्ती करणारा दिल्लीचा युधिष्टीर आणि कोल्हापूरचा सिकंदर शेख विरुध्द हरियाणाचा रोहील या रंगतदार लढती मैदानाचे आकर्षण ठरणार आहेत. या चारही कुस्त्यातील विजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आपापल्या गटात सुवर्ण तसेच रौप्य पदक मिळवणाऱ्या नामांकित पैलवानांच्या 26 निकाली व चटपटीत कुस्त्या पाहण्याची संधीही शौकिनांना मिळणार असल्याचे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव, कुस्ती समितीचे कृष्णात जाधव व विजय जाधव यांनी सांगितले. कुस्तीचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी यात्रास्थळावर सेवागिरी ट्रस्टने तयार केलेल्या ऐंशी फूट व्यासाच्या आखाड्याभोवती चारी बाजूस गॅलरी उभारण्यात येत आहेत.
कुस्तीचे डाव-प्रतिडाव तसेच कुस्तीबद्दलचे जाणकार शंकर पुजारी कोथळीकर, राजाभाऊ देवकाते, युवराज केचे, राजेंद्र जगदाळे सर या स्पर्धेचे निवेदन करणार आहेत. या आखाड्यात होणाऱ्या नामांकित मल्लांच्या मुख्य लढती पुढील प्रमाणे – शौलेश शेळके पुणे विरुध्द प्रकाश बनकर कोल्हापूर, परमिंदर हरियाणा विरुद्ध सचिन चव्हाण खवसपूर, संग्राम पाटील पुणे विरुध्द सुहास घोडगे पुणे, पुणेचा संदीप काळे विरुध्द अनिल धोत्रे खवसपूर या लढती पाहण्यास कुस्तीप्रेमी आतुर आहेत.
याशिवाय तुकाराम शितोळे पुणे व ऑल इंडिया चॅंपियन सोनबा गोंगाणे कोल्हापूर, महेश शिंदे खवसपूर व विकास सुळ सातारा, प्रशात शिदे सांगली व गणेश शेळके इचलकरंजी, संतोष पडळकर पुणे व धनाजी कोळी, नवनाथ इगळे पुणे व सतपाल सोनटक्के पुणे, आशिर्ष चावरे सोलापूर व अक्षय चोरगे पुणे, विवेक हरियाणा व शरद पवार सांगली, अंकित हरियाणा व बापू मदने पुने, शिवकुमार पुणे व दादा शेळके पुणे, किरण बरकडे सोलापूर व महेश पाटील सांगली, विक्रम घोरपडे खवसपूर व सुबोध पाटील पुणे, प्रशांत जगताप इचलकरंजी व विनायक वाल्हकर पुणे महेश कुंभार बुध व शुभम मांडवे कुमठे, सुमित गुजर खातगुण व मंदार पाटील मुबई, ओंकार शिदे जांब व देवानंद पवार पुणे, राजू हिप्परकर पुणे व पंकज पवार लातूर या लढती लक्षवेधी होणार आहेत. या मैदानात होणाऱ्या पाच हजार रुपये बक्षिसांपर्यंतच्या कुस्त्यांचे जोड मंगळवारी स्पर्धेच्या दिवशी सकाळी नऊ ते बारा यावेळेत कुस्ती आखाड्यावर नोंदविण्यात येणार असून त्यासाठी स्पर्धकांनी वेळेवर हजर रहावे असे आवाहन सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी केले आहे.