पुणे -मागील अनेक वर्षांपासून पुणे ते नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रखडला होता. याचा डीपीआर’ अर्थात सविस्तर प्रकल्प आराखडा 2018 मध्ये तयार होता. मात्र, दुर्दैवाने याचे सादरीकरण झाले नाही. प्रकल्पासाठी आवश्यक तत्वत: मंजुरीदेखील केंद्राकडून देखील मिळाली आहे. आता राज्याच्या कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव आहे. नियोजित वेळेत सर्व कामे मार्गी लागल्यास सन 2024 पर्यंत ही सेवा सुरू होणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापादरम्यान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरण आदी काम सुरू आहे. तर राजगुरूनगर घाट येथील बायपासची एक लेनदेखील दिवाळीपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
तर सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प लक्षात घेता चाकण, वाघोली, रांजणगाव या परिसरांना जोडणारी वाहतूक सुविधा आणि मल्टिमॉडेल हब तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे कोल्हे म्हणाले. किल्ल्यांची स्वच्छता म्हणजे केवळ संवर्धन नाही. यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. किल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यटन यांची सांगड घातल्यास रोजगार निर्मितीच्या दृष्टीने देखील विचार केला पाहिजे, असे कोल्हे यांनी नमूद केले.
जुन्नर तालुक्यात शिवसंस्कार सृष्टी’
शिरुर मतदारसंघातील पर्यटनाला चालना मिळण्याच्या अनुषंगाने आगामी काळात भक्ती आणि शक्तीच्या ठिकाणांचा समावेश असणारा भक्ती-शक्ती कॉरिडॉर’ प्रस्तावित आहे. तर जुन्नर तालुक्यात शिवसंस्कार सृष्टी’ हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना देखील सूचना दिल्याचे कोल्हे यांनी सांगितले.