दुसऱ्या लाटेसाठी पुणे पालिका सज्ज

करोनाबाधितांवर उपचारांसाठी 3 हजार ऑक्‍सिजन बेड तयार

पुणे – युरोपात थैमान घालत असलेली करोनाची दुसरी लाट डिसेंबर-जानेवारीत येण्याची भीती केंद्रीय आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असून तब्बल 3 हजार ऑक्‍सिजन बेडची सुविधा उभारण्यात आली आहे. याशिवाय खासगी हॉस्पिटलचेही सुमारे तेवढेच ऑक्‍सिजन बेड 24 तासांत उपलब्ध करण्याचे नियोजन तयार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

शहरात या साथीने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर काळात कहर केला. त्यावेळी बाधितांना ऑक्‍सिजन बेड मिळत नव्हते. आठ महिन्यांत शहरात जास्तीत जास्त ऑक्‍सिजन बेड उभारण्याची तयारी केली. पहिला बाधित सापडला त्यावेळी शासकीय दवाखान्यात 250 ऑक्‍सिजन बेड होते. पालिका प्रशासनाने 711 खासगीपैकी मोठ्या 84 हॉस्पिटल्सचे सुमारे साडेपाच हजार बेड ताब्यात घेतले.

सुमारे 12 हजार खाटांची क्षमता असलेली कोविड सेंटर सुरू केली. दरम्यान, या काळात पालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये अडीच हजार ऑक्‍सिजन बेडची सुविधा निर्माण केली.

सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांपैकी 45 टक्‍के रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत. त्यामुळे, डिसेंबर महिन्यात दुसरी लाट आली, तरी तब्बल 2,910 बेड उपलब्ध असतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.