ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील टेकवडी येथील पोलीस पाटील पोपटराव इंदलकर यांच्या शेतात बिबट्या आढळला. पुरंदर तालुक्याचा पूर्व भाग खरतरं वर्षानुवर्षे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असे, मात्र पुरंदर उपसा सिंचन योजना या भागाला वरदान ठरली असून या योजनेने पुरंदरची दुष्काळी पुरंदर ही ओळख पुसून टाकली आहे.
दरम्यान, काल (दि. १०) इंदलकर यांच्या शेतात त्यांचा मुलगा ऊसाला पाणी देत असताना त्याला उसात बिबटया असल्याचे जाणवले होते. यावेळी त्याने परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून हा प्राणी बिबट्या असल्याची खात्री केली. भुलेश्वर वन उद्यानातील वनकर्मचारी काळूराम शेंडगे यांना बिबट्या असल्याचे कळवले त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना याबाबत खबर देऊन लगेच घटनास्थळी उपस्थित झाले. वनरक्षक गणेश पवार व वनपाल युवराज पाचरणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पायांचे ठसे पाहून बिबट्या असल्याची खात्री केली.
वनपाल युवराज पाचरणे यांनी सांगितले की, या बिबट्याचे वय दीड ते दोन वर्ष असून परिसरातील नागरिकांनी शक्यतो रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाणे टाळा, शक्यतो एकटे जाऊ नका, मोबाईल वर गाणी वाजवत किंवा तोंडाने गाणी म्हणत जा व शेतात जाण्यापूर्वी फटाके वाजवा अशा सूचना त्यांनाही दिल्या. तसेच पुन्हा बिबट्या दिसल्यास वन विभागाशी संपर्क करा असे सांगितले.