दहा दिवसांनी समजल्यानंतर रुग्णालय बंद ठेवण्याच्या सूचना
ओतूर – दुबईवारी करून आलेल्या डॉक्टर दाम्पत्याला खबरदारी म्हणून रुग्णालय बंद ठेवण्यास प्रशासनाने सांगितले खरे; परंतु ही बाब तब्बल दहा दिवसांनी प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे या दहा दिवसांत या डॉक्टर दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे काय? असा सवाल स्वतः संबंधित डॉक्टरनेच केला आहे.
जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून करोनाची धास्ती व दहशतीने बाजारपेठा, उद्योगधंदे, व्यवसाय या सर्वांवर परिणाम होत असून सगळीकडे शुकशुकाट जाणवत आहे. अशातच दुबईहून परदेशवारी करून काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील पूर्वभागातील मोठ्या गावात आलेल्या एका डॉक्टरला पंधरा दिवस त्यांचे खासगी रुग्णालयात बंद ठेवून कोणाच्याही संपर्कात न येण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत.
दरम्यान संबंधित डॉक्टर दाम्पत्याला करोनाची अथवा कोणत्याही साथीच्या आजारांची लक्षणे नसतानाही केवळ दक्षता म्हणून प्रशासनाने त्यांना रुग्णालय बंद ठेवून संपर्क टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु गेल्या दहा दिवसांत त्या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची अथवा व्यक्तींची तपासणी आरोग्य प्रशासन करणार का? असा सवाल संबंधित डॉक्टरनेच उपस्थित केला आहे.
या गावातील एक डॉक्टर दाम्पत्य काही दिवसांपूर्वी दुबईला फिरायला गेले होते, परदेशवारी करून मायदेशी परतलेल्या या डॉक्टरांना स्थानिक आरोग्य, पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून मंगळवार (दि. 17)पासून पुढील पंधरा दिवस त्यांचे खासगी रुग्णालय बंद ठेवून कोणाच्याही संपर्कात येऊ नये, असा आदेश बजविण्यात आल्याने संबंधित डॉक्टरांनी आपले रुग्णालय मंगळवारपासून बंद ठेवले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
यामुळे जीवाची दुबईवारी संबंधित डॉक्टरला त्रासदायक ठरण्याची चर्चा परिसरात सुरू आहे. असे असताना जे पथक डॉक्टरांकडे चौकशीसाठी गेले होते त्यांच्याकडेदेखील कोणत्याही प्रकारची सुरक्षासाधने नव्हती हे विशेष.