शहरातील 22, ग्रामीण भागातील 46 व्यक्ती परदेशी नागरिकांच्या संपर्कात
बारामती – बारामती तालुक्यामध्ये एकूण 2 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते; परंतु त्यांना याबाबतची लक्षणे नसल्यामुळे दाखल करून घेण्यात आले नाही तर दुसऱ्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे, त्यामुळे तालुक्यात आतापर्यंततरी एकही करोनाचा रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
करोना विषाणूबाबत प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती देण्याकरीता मंगळवारी (दि. 17) आयोजित पत्रकारपरिषदेमध्ये प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे बोलत होते. यावेळी तहसीलदार विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी योगेश कडूसकर तसेच इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे म्हणाले, प्रशासनाकडून बारामतीमध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये गृहभेटीमार्फत माहिती गोळा केली जात आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 22 हजार 997 तर शहरी भागातील 3 हजार 28 कुटुंबांना पथकामार्फत भेटी देण्यात आल्या आहेत.
परदेशी व्यक्तींशी आतापर्यंत संपर्क आलेल्या ग्रामीण भागातील 46 तर शहरी भागामधील 22 व्यक्ती आहेत. प्रांताधिकारी कांबळे म्हणाले की, नागरिकांनी गर्दीची ठिकाणे तसेच कार्यक्रम यासर्व बाबी टाळाव्यात, करोनाचा संसर्ग टाळण्याकरीता वैयक्तिक स्वच्छतेला महत्त्व द्यावे.
आरोग्य विभागाकडून येणाऱ्या पथकाने सांगितल्यानुसार हाताची स्वच्छता ठेवावी, तसेच परदेशातून कोणी व्यक्ती आलेली असेल तर त्या भागाची माहिती तसेच याअनुषंगाने आपल्याकडे याबाबत जर काहीही माहिती प्राप्त झाली तर ती व्हॉट्ऍप किंवा इतर सोशल मीडियामार्फत प्रशासनाला त्वरीत कळवावी, असे आवाहन त्यांनी केले.
करोनासंबंधि सोशल मीडियावर कोणी चुकीची माहिती पसरवली तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिते प्रांताधिकारी कांबळे यांनी दिली.
मंडई, आठवडे बाजार 31 मार्चपर्यंत बंद
गुरूवार (दि. 19) पासून मंगळवार (दि. 31) पर्यंत गणेश मार्केट भाजी मंडई, सूर्यनगरी (जळोची) येथील भाजी मंडई व सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक, व्यावसायिक , हॉटेल मालक, कापड दुकानदार, किराणा दुकानदार, उपहारगृहे, किरकोळ विक्रेते, पदपथावरील विक्रेते,भाजी विक्रेता, उद्योग व्यावसायिक सांगितले असल्याचे नगरपरिषद उपमुख्याधिकारी, बारामती पद्मश्री दाईगडे यांनी सांगितले.
विलगीकरण कक्ष स्थापन
बारामती शहरामध्ये सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल येथे विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. आवश्यकतेनुसार मेडीकल कॉलेज, खासगी रुग्णालये, रुई हॉस्पिटल येथे साधनसाम्रगीची व्यवस्था करण्यात येईल, असे प्रांताधिकारी कांबळे यांनी सांगितले.