पुणे – बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी (डीएसके) यांची लॅंड क्रुझर ही आणखी एक अलिशान गाडी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून जप्त केली. भारतीय बाजारपेठेत याची किंमत 90 ते 96 लाख रुपये इतकी आहे. ही गाडी माजी मंत्री विजय शिवतारे यांचे स्वीय सहायक हे वापरत असल्याचे समजते.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डीएसके, त्यांचे कुटुंबीय व कंपनीच्या नावे असणारी 19 चारचाकी वाहने व एक महागडी दुचाकी जप्त केली होती. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार, दि.15 फेब्रुवारीला डीएसकेंच्या सहा वाहनांचा लिलाव केला.
दरम्यान, डीएसकेंच्या नावे असलेल्या विदेशी बनावटीची आणखी काही वाहने बाहेर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. ही वाहने कंपनीच्या अधिकृत सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सर्व्हिसिंग व अन्य कामांसाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित सर्व सेंटरला त्याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार मुंबई येथील मधुबन टोयटा या सर्व्हिस सेंटर येथे लॅंड क्रुझर (एमएच-12 एम.जे 9999) ही गाडी जप्त केली आहे.