तेल अविव – मध्यपूर्वेतील दोन व्यापारी जहाजांवर मंगळवारी संशयित हौथी बंडखोरांकडून ड्रोन हल्ले झाले आहेत. या दोन जहाजांपैकी एक जहाज अमेरिकेकडून भारताकडे येत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या दोन हल्ल्यांपैकी पहिला हल्ला लाल समुद्राच्या दक्षिणेकडील भागात येमेनच्या होदेजदा बंदराच्या पश्चिमेकडील भागात झाला. ड्रोन हल्ल्यामुळे जहाजाच्या खिडकीचे किरकोळ नुकसान झाले आहे, असे ब्रिटीश सैन्यदलाच्या युनायटेड किंगडम मेरीटाईम ऑपरेशन्सने म्हटले आहे.
हा ड्रोन हल्ला होण्यापूर्वी या ब्रिटीश जहाजाजवळ एक छोटी नौका होती, असेही या संस्थेने म्हटले आहे. या ड्रोन हल्ल्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. यानंतर येमेनमधील एडन शहराजवळ दुसऱ्या जहाजावर ड्रोन हल्ला झाला. मार्शल आयलंडचे हे जहाज अमेरिकेवरून भारताकडे येत होते.
या जहाजावर देखील ड्रोनमुळे झालेल्या स्फोटामध्ये कोणीही जखमी झाले नाही. नंतर, या दोन्ही वेगळ्या जहाजांवर इराण-समर्थित हौथी बंडखोरांनी हल्ला केल्याचे या गटाचा लष्करी प्रवक्ता ब्रिगेडियर जनरल याह्या सारी याने एका निवेदनात म्हटले आहे. मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्याने कोणताही पुरावा दिला नाही.
नोव्हेंबरपासून हौथी बंडखोरांनी हमासच्या विरोधात गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यावरून लाल समुद्रातील जहाजांना वारंवार लक्ष्य केले आहे. परंतु त्यांनी इस्रायलशी कोणताही संबंध नसलेल्या जहाजांना देखील वारंवार लक्ष्य केले आहे, त्यामुळे आशिया, मध्यपूर्व आणि युरोपमधील व्यापाराच्या प्रमुख सागरी मार्गांना धोका निर्माण झाला आहे.