पुणे -आज मेट्रोच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर आपण स्वप्नात आहोत, असे वाटते. कल्पनेतील मेट्रो व्यवहारात आली, असा अभिप्राय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वनाज स्थानकावरील नोंदवहीत नोंदवला. पाटील यांनी शुक्रवारी (दि. 2) मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केल्यानंतर त्यांनी गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक येथे पाहणी करुन वनाज स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, “”शहराची वाढती गरज पाहता आपण रस्ते, उड्डाणपूल आदी प्रकल्प करत आहोत. पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू असून, 33 किमीचा पूर्ण एक टप्पा मार्च 2023 पर्यंत महामेट्रोकडून पूर्ण करण्यात येईल. पुढच्या तीन टप्प्यांनाही गती देण्यात येईल. त्यातील दोन टप्प्यांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून, त्याचा स्वत: पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. तसेच तिसऱ्या टप्प्यातील 85 किमी लांबीच्या मेट्रोचा प्रकल्प अहवाल महानगरपालिका करत आहे. त्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत खूप मोठा सकारात्मक बदल होईल. प्रवासी वाहतूक गतीने होण्याचे उद्दिष्ट असतानाच प्रत्येक स्टेशन वेगवेगळ्या संकल्पनेनुसार डिझाईन करण्यात आले असल्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मल्टीमॉडेल भूमिगत स्थानक
शिवाजीनगर एसटी बस स्थानकाखाली मल्टीमॉडेल एकिकृत भूमिगत स्थानक बनवण्यात आले असून एसटी, रेल्वे स्थानक, पीएमपीएल आणि हिंजवडी मेट्रो लाइनशी जोडणी होणार असल्याने प्रवाशांना सर्व वाहतूक सुविधांचा उपयोग घेता येणार आहे. शिवाजीनगर मेट्रो स्थानकाला भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपल्यासमोर उभा राहील, अशा संकल्पनेनुसार या स्थानकाचे डिझाईन करण्यात आले आहे. ऐतिहासिक बांधकामांच्या प्रतिकृतीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण संरचना या बांधकामात वापरण्यात आल्या आहेत, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणेरी पगडीची भुरळ!
जंगली महाराज रस्ता :विशेष खासीयत असलेली पुणेरी पगडी जगभर प्रसिद्ध आहे. या पगडीची भुरळ पडली नाही तर नवलच! महामेट्रोवरही तिने आपली छाप सोडली आहे. त्यामुळेच तर महामेट्रोकडून छत्रपती संभाजी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो स्थानकाच्या इमारतीला पगडीचा आकार देण्यात आला आहे. या इमारतीचे काम गतीने सुरू आहे. कामानंतर खालील छायाचित्राप्रमाणे ही इमारत दिसणार आहे.