भुवनेश्वर – भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने “अग्नि प्राइम’ क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राला अग्नि-पी असेही म्हटले जाते. डीआरडीओकडून “अग्नि प्राइम’ या न्यू जनरेशन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या क्षेपणास्त्रामध्ये एकाच हल्ल्यात शत्रूचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे.
ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून “अग्नि प्राइम’ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. प्रणालीची अचूकता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी अग्नि प्राइम क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी विकासात्मक चाचण्यांनंतर वापरकर्त्यांनी प्री-इंडक्शन नाईट लॉंच केले. डीआरडीओने बुधवारी रात्री 7:40 वाजता अब्दुल कलाम बेटावरील लॉन्चिंग कॉम्प्लेक्स 4 वरून अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाद्वारे 7 जून रोजी नवीन पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र “अग्नि प्राइम’ची यशस्वी उड्डाण चाचणी करण्यात आली. यामुळे प्रणालीला सशस्र दलात समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज हे मिसाईल लक्ष्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे.
अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
– 11000 किलो वजनाच्या या क्षेपणास्त्रात 2000 किमी अंतरापर्यंतच्या कोणत्याही लक्ष्याला लक्ष्य करण्याची क्षमता.
– 34.5 फूट लांबीच्या क्षेपणास्त्रावर एक किंवा अनेक स्वतंत्रपणे टार्गेटेबल रीएंट्री व्हेईकल (MIRV) वॉरहेड्स बसवता येतात.
– या क्षेपणास्त्राद्वारे अनेक लक्ष्यांवर एकाच वेळी हल्ला केला जाऊ शकतो. हे क्षेपणास्त्र उच्च-तीव्रतेची स्फोटक आणि आण्विक शस्त्र वाहून नेण्यास सक्षम.
– अग्नि प्राइम हे दुसऱ्या टप्प्यातील क्षेपणास्त्र आहे. यामध्ये 1500 किलो ते 3000 किलो वजनाची शस्त्रे बसवता येतात. हे स्टेज-2 मधील रॉकेट मोटर आधारित क्षेपणास्त्र आहे.