नवी दिल्ली – महाराष्ट्रातील लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे या आणि इतर मागासवर्गीय जाती केंद्रीय यादीत सुचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत असल्याची माहिती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दिली.
यामध्ये राज्यातील काही ओबीसीमध्ये असणाऱ्या जातींना केंद्रीय यादीत सुचीबद्ध करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात इतर मागासवर्ग आयोगाचे काम चांगले सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
वर्ष 1993मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला 2018मध्ये संवैधानिक दर्जा प्राप्त झाला. आता या आयोगाच्या सक्रियतेमुळे मागासवर्गीय विद्यार्थीना बळ मिळत आहे. 2021-22 या शैक्षणकि वर्षात वैद्यकीय क्षेत्रात आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यात एमबीबीएस व एमडीचा समावेश आहे.
याशिवाय, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळेत 27 टक्के आरक्षण सुरू करण्यात आले. राष्ट्रीय मागासवर्ग वित्त महामंडळाव्दारे 2022-23मध्ये 1,94,810 लाभार्थ्यांना 678.05 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.