अकोले – अकोले शहरातून मिरवणूक काढून आघाडीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी डॉ. लहामटे हे काल जुन्नर येथे मुक्कामी गेले होते. तेथे त्यांनी महादेव कोळी समाजाच्या देवीचे व शिवाई देवीचे गुरुवारी पहाटे दर्शन घेतले. आज अकोले शहरातून फेरी काढून तहसीलदार कार्यालयात निवणूक अधिकारी उदय किसवे यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मुकेश कांबळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. डॉ. लहामटे यांच्याही अर्जावर एकमेव सूचक म्हणून राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री विनय सावंत यांचे नाव आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे उपस्थित होते. त्यापूर्वी लहामटे यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची सभा झाली. यावेळी अनेकांची भाषणे झाली.
वंचित आघाडीचे उमेदवार दीपक यशवंत पथवे यांनी कोणताही गाजावाजा न करता आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यावर रवींद्र पथवे, सागर पथवे, रामदास पथवे, सुनील पथवे, दत्तात्रय चासकर, रोहिदास पथवे, विलास आगिवले, वसंत पथवे, विजय आगिवले, सुरेश पथवे यांचे सूचक म्हणून नाव आहे.