पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील विविध विद्यापीठांच्या वित्त व लेखा बाबींसंदर्भात विविध शासन निर्णय, आदेश, परिपत्रके अंमलबजावणीसाठी शासनातर्फे वेळोवेळी जारी करण्यात येतात.
त्याबाबत विद्यापीठांचे वित्तीय कामकाज सुकर होण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण विभाग व उच्च शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठांच्या वित्तीय बाबी या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात सुरू असलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरु प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे, सुकाणू समिती सदस्य अनिल राव आदी उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत होणाऱ्या वित्तीय बदलाबाबत, तसेच विद्यापीठांच्या आर्थिक विकासाबाबत प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. १६ मे रोजी सीए मनोज चांडक, सीए पराग राठी, सीए मिलिंद लिमये, सीए डॉ. दिलीप सातभाई आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे.
अकृषी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, समूह विद्यापीठ, अभिमत विद्यापीठातील मुख्य वित्त लेखा अधिकारी, उप वित्त लेखा अधिकारी, उपकुलसचिव (वित्त व लेखा विभाग), उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्रालयीन अधिकारी, संचालयनातील अधिकारी, कर्मचारी, सनदी लेखापाल, तज्ज्ञ मार्गदर्शक आदी या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत मगर यांनी केले.