नगर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परिक्षेत राहुरी विद्यापीठ येथील डॉ. वंदना कारखेले-नागरगोजे यांनी यश मिळविले. त्यांची आता पोलीस उपाधीक्षकपदी निवड झाली आहे.
महात्मा फुले कृषी महाविद्यापीठात चालक म्हणून नोकरीस असलेल्या अशोक कारखेले यांची ती मुलगी तसेच पुणे येथील एका खासगी कंपनीत औषध गुणवत्ता नियंत्रण अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या अभिजित नागरगोजे यांच्या त्या पत्नी आहेत. डॉ. वंदना यांनी अत्यंत प्रतिकुल शिक्षण पूर्ण केले. तसेच हे यश देखील अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत मिळविले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
डॉ. वंदना यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राहुरी येथे झाले आहे. नगर शहरातील गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता. पदवीनंतर त्यांनी पुण्यातील एका खासगी क्लासेसमधून परिक्षांचा सराव केला. पहिल्या तीनच वर्षांत त्यांनी चार स्पर्धा परिक्षांमधून नेत्रदीपक यश मिळविले.
सध्या त्या पुणे येथे राज्य गुप्त वार्ता विभागात अधिकारी म्हणून सेवेत आहेत. तत्पूर्वी त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागातही उपनिरीक्षक पदावर काही काळ नोकरी केली. परिक्षेसाठी आई-वडील व भाऊ यांची साथ मिळाली. तसेच पती अभिजित नागरगोजे आणि सतीश पाटील यांचे परिक्षेसाठी विशेष मार्गदर्शन मिळाल्याचे डॉ. वंदना यांनी “प्रभात’ला सांगितले.