पुणे – करोना बाधितांना सौम्य लक्षणे असतील किंवा अजिबात नसतील तर सरकारच्या पात्रता निकषांनुसार त्यांना गृह विलगीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या परवानगीबरोबरच रुग्णांना आणि त्यांची देखभाल करणाऱ्यांसाठी या सूचना आहेत, असे पालिकेने म्हटले आहे.
महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे
* अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये त्याची तपासणी करून त्यांना अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करावे.
* घरामध्ये स्वतंत्र खोली, शौचालय असावे. हे ठिकाण महापालिकेच्या सहायक आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य निरीक्षकामार्फत तपासलेले असावे.
* घरी दिवस-रात्र काळजी घेणारी निरोगी व्यक्ती उपलब्ध असावी. ती आणि रुग्णालय यांच्यामध्ये रोजचा संपर्क असावा.
* वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती आणि निकट संपर्कातील व्यक्तींना प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची मात्रा द्यावी.
* “आरोग्य सेतू’ किंवा “महाकवच’ ही दोन्ही मोबाइल ऍप डाऊनलोड करून ती सतत ऍक्टिव्ह राहतील याची दक्षता घ्यावी.
* रुग्णाने गृहविलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र द्यावे, तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
* एखाद्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असेल आणि त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार असतील तर गृहविलगीकरणाचा निर्णय ही त्या व्यक्तीची तपासणी केलेल्या वैद्यकीय अधिकारी, कोव्हिड सेंटर अथवा खासगी रुग्णालयातील डॉक्टर यांची जबाबदारी असेल.
* गृह विलगीकरण केलेल्या व्यक्तीला धाप लागणे, श्वासोच्छवासास अडथळा होणे, छातीमध्ये वेदना, शुद्ध हरपणे, ओठ/चेहरा निळसर पडणे अशी लक्षणे दिसून लागल्यास तातडीने माहिती पत्रकातील अधिकाऱ्यांशी संपर्क करणे.